
अमेरिकेतील टेक्सास येथे एका 23 वर्षीय हिंदुस्थानी विद्यार्थिनीचा रहस्यमय मृत्यू झाला आहे. राजलक्ष्मी यार्लागड्डा असे मयत मुलीचे नाव असून ती मूळची आंध्र प्रदेशमधील रहिवासी होती. टेक्सास येथे ती ए अँड एम युनिव्हर्सिटी-कोर्पस क्रिस्टी येथून पदवीचे शिक्षण घेतले होते. सध्या ती नोकरीचा शोध घेत होती. मात्र 7 नोव्हेंबर 2025 रोजी ती अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळली.
राजलक्ष्मी आंध्र प्रदेशमधील बापटला जिल्ह्यातील करमचेडू गावची रहिवासी होती. तिचे आई-वडील शेती करतात. चांगले शिकून मोठी नोकरी करण्याचे स्वप्न घेऊन राजलक्ष्मी अमेरिकेला गेली होती. मात्र आता तिचा अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
राजलक्ष्मीचा दोन-तीन दिवसांपासून आजारी होती. तिला खोकला येत होता आणि छातीमध्ये वेदनाही होत होत्या. 7 नोव्हेंबरच्या सकाळी नेहमीप्रमाणे अलार्म वाजला, मात्र राजलक्ष्मी उठलीच नाही. झोपेतच तिचा मृत्यू झाला, असे तिचा चुलत भाऊ चैतन्य याने माध्यमांशी बोलताना सांगितले.
दरम्यान, राजलक्ष्मी हिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे जाणून घेण्यासाठी मृतदेहाचे शवविच्छेदन केले जात आहे. शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.
राजलक्ष्मी एकटी राहत होती आणि आजारी असतानाही तिने कुणाला याची कल्पना येऊ दिली नाही. अचानक तिचा मृत्यू झाल्याने सर्वांना धक्का बसला आहे, असे चैतन्यने सांगितले. तसेच त्याने टेक्सासमध्ये फंडरेजर सुरू केले असून यातून मिळणारे पैसे राजलक्ष्मीच्या कुटुंबाला देण्याचे ठरवले आहे. या पैशातून राजलक्ष्मीचा मृतदेह मायदेशी आणण्याचे आणि तिच्यावर अंत्यसंस्कार केला जाईल, असे चैतन्यने सांगितले.


























































