इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू फ्लिंटॉफचा भीषण अपघात

2745

इंग्लंडचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू अँड्य्रू फ्लिंटॉफचा भीषण अपघात झाला आहे. तो 124 किलोमीटर प्रति तास वेगाने रेसर कार चालवत होता. कारवरचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं कळते आहे. यॉर्क भागातील एलव्हींग्टन एअरफील्ड भागात ही दुर्घटना घडली आहे.

फ्लिंटॉफच्या कारला ज्या ठिकाणी अपघात झाला त्याच ठिकाणी टॉप गिअर या वेब मालिकेचा सूत्रसंचालक रिचर्ड हॅमंडला जीवघेणा अपघात झाला होता. योगायोगाची गोष्ट ही आहे की रिचर्ड हॅमंडप्रमाणेच अँड्र्यू हा देखील टॉप गिअर मालिकेसाठी चित्रीकरण करत होता. जेव्हा अँड्र्यूच्या कारला अपघात झाला तेव्हा टॉप गिअर मालिकेचा सहसूत्रधार पॅडी मॅकगिनेस आणि ख्रिस हॅरीस या दोघांनीही तो पाहिला होता. अँड्र्यूची कार जेव्हा रस्त्यावरून उलटली आणि धूर-धुळीच्या लोटामध्ये जाऊन रस्त्याच्या कडेला आदळली तेव्हा आमच्या हृदयात धस्स झालं होतं असं  पॅडी आणि ख्रिस या दोघांनी म्हटले आहे.

अँड्र्यूचा अपघात पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शीने म्हणजेच डेव्हीड रॉबिनसन याने ‘द सन’ या वर्तमानपत्राशी बोलाताना सांगितलं की अँड्र्यूची कार अतिशय वेगाने धावत होती, अचानक आम्हाला धूर दिसला आणि नंतर आम्हाला कळालं की गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन आदळली आहे. आम्ही सगळ्यांनी तातडीने गाडीच्या दिशेने धाव घेतली.

सुदैवाने या अपघातातून अँड्र्यू बचावला असून किरकोळ जखमांशिवाय त्याला काहीही झालेलं नाहीये. त्याच्यावर उपचार केल्यानंतर त्याने टॉप गिअर मालिकेसाठीची चित्रीकरणही पूर्ण केलं. अँड्र्यूचा अपघात बघितलेल्या डेव्हीड रॉबिनसनने म्हटलंय की ज्या पद्धतीने आणि ज्या वेगात अँड्र्यूचा अपघात झाला होता, तो जीवघेणा होता,सुदैवाने त्याला काही झालेलं नाहीये. टॉप गिअर या वेब मालिकेचा सूत्रधार रिचर्ड हॅमंडचा अशाच पद्धतीने अपघात झाला होता. या अपघातामुळे तो इतका गंभीर जखमी झाला होता की 2006 साली कोमामध्ये गेला होता. देवकृपेने आता तो पूर्णपणे बरा झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या