
‘जय जय भराडी देवी’… या जयघोषात सोमवारी (17) ‘आंगणेवाडी नगरी’ भक्ती रसात न्हावून गेली. वार्षिक यात्रोत्सवाच्या निमित्ताने आंगणेवाडीत लाखो भाविकांचा जनसागर उसळला. पहाटे तीन वाजल्यापासून दर्शनास सुरवात झाली. दिवसभर 9 रांगांमधून भाविकांना देवीचे सुलभ व जलद दर्शन दिले जात होते. यात्रोत्सवात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित राहत भराडी देवीचे दर्शन घेतले.

आंगणेवाडी मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांच्या हस्ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा स्वागत सत्कार करण्यात आला. यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, परिवहनमंत्री अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. आंगणेवाडी मंडळ आणि प्रशासन यांच्याकडून भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी व्यवस्था करण्यात आली होती. यात्रेसाठी शेकडो पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला होता. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून यात्रोत्सवावर लक्ष ठेवले जात होते. यात्रेत नेते मंडळी व सेलिब्रेटींनी हजेरी लावली.
नवसाला पावणारी अशी ख्याती राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचलेल्या मालवण तालुक्यातील बिळवस आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या यात्रोत्सवात लाखो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांच्या आरासाने मंदिर परिसर झळाळून गेला. शेकडो दुकानांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाली. मंगळवारी मोडयात्रेने यात्रोत्सवाची सांगता होणार आहे.
राज्यभरातून येणाऱ्या भाविकांसाठी नऊ रांगा मधून दर्शनाची सुविधा आंगणेवाडी मंडळ मुंबई व स्थानिक मंडळाकडून देण्यात आली होती. यासह व्हीआयपींसह अपंग, महिला व अन्य मंडळींसाठी स्वतंत्र रांग ठेवण्यात आली होती. मुंबई सिद्धिविनायक मंदिर धर्तीवर देवी भराडीचे मुख दर्शनासाठी व ओटी स्वीकारण्यासाठी स्वतंत्र रांग असल्याने भाविक दर्शनाने सुखावले. एकूणच आंगणेवाडी मंडळ, जिल्हा व तालुका प्रशासन, पोलीस प्रशासन, आंगणेवाडी व विविध मंडळांचे स्वयंसेवक यांनी विशेष मेहनत घेत योग्य नियोजन केले.
मंडळ प्रशासनासह, जिल्हा तालुका व ग्रामपंचायत प्रशासन, एसटी, पोलीस यंत्रणा, जलद कृती दलाची पथके सज्ज होती. टॉवरच्या माध्यमातूनही पोलीस यात्रेवर लक्ष ठेऊन होते. आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने आरोग्य विभाग महसुल ग्रामपंचायत पंचायत समिती या बरोबरच आंगणेवाडी मंडळाच्या वतीने भाविकांना सुलभ दर्शनासाठी सुविधा पुरवल्या होत्या. नवसफेड करताना तुलाभार करण्यासही मोठी गर्दी होती.
आंगणेवाडी यात्रेत विविध प्रकारची दुकाने सजली होती. सर्वाधिक मागणी मालवणी खाजाला होती. तसेच मिठाई दुकाने, हॉटेल, कपडे, चादर, सर्व प्रकारचे सर्व गृहपयोगी वस्तू खेळणी यांनी सजलेल्या दुकानात मोठी गर्दी होती. अवजारे खरेदीसही गर्दी होती. काही वस्तू तर या आंगणेवाडीतच खरेदी करायच्या असतात. असेही खरेदीदार, हौशे-नौशे-गौशे यांच्या माध्यमातून सांगितले जात होते. कोट्यावधीची उलाढाल झाली. झुलता पाळणा व अन्य खेळांची बच्चे व अन्य मंडळींनी मजा लुटली.
लघु पाटबंधारे योजनेचा उद्घोषणा सोहळा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंगणेवाडी भराडी देवीचे दर्शन घेऊन मंदिरालगत असलेल्या शिवसेनेच्या शाखेला भेट दिली. यावेळी मालवण तालुका सहसंपर्क प्रमुख दीपक आप्पाजी आंगणे व अन्य शिवसैनिक उपस्थित होते. मसुरे आंगणेवाडी येथील प्रशासकीय मान्यता मिळालेल्या लघु पाटबंधारे योजनेचा उद्घोषणा सोहळा मुख्यमंत्री यांच्या हस्ते आंगणेवाडी मंडळाच्या व्यासपीठावर संपन्न झाला.
























































