मराठीद्वेष्टय़ा आलेमाव यांच्याविरोधात गोव्यात संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पणजी

राष्ट्रवादी काँग्रेसचे मराठीद्वेष्टे आमदार चर्चिल आलेमाव यांच्याविरुध्द गोव्यात प्रचंड संताप निर्माण झाला आहे. गोवा विधानसभेत मराठी भाषेतून चर्चा सुरू झाली की आलेमाव हे कानात बोटे घालतात. मराठीतील चर्चा त्यांच्या पचनी पडत नाही आणि ते कोंकणी भाषेतून भाषांतराचा आग्रह धरतात.

साखळी येथील बिल्वदल संस्थेकडून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना साखळी भूषण पुरस्कार जाहीर झाला. त्याबद्दल गोवा विधानसभेत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सुदिन ढवळीकर यांनी त्यांचे अभिनंदन करताना मराठीतून भाषण केले. त्यावर आलेमाव यांनी कानांत बोटे घालत ‘सभापती महाशय आपल्याला काहीच समजत नाही, कोंकणीतून भाषांतर करून सांगा,’ अशी मागणी केली. ‘येरे येरे पावसा…’ कविता तोंडपाठ असलेल्या आलेमाव यांना आताच मराठीची ऍलर्जी कशी झाली असा सवाल केला जात आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार आणि माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे, सभापती राजेश पाटणेकर यांनी आलेमाव यांना मराठी चांगले येते याचे दाखले सभागृहात दिले. तरीसुध्दा आलेमाव यांनी मराठीतील चर्चा केंकणीत भाषांतरीत करून मिळावी असा जाणीवपूर्वक आग्रह धरला होता.