
सामना ऑनलाईन । परभणी
परभणीत एका उंटाने गळा पकडल्यामुळे एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. समीर शमशोद्दीन (16) असे मृत मुलाचे नाव आहे. उरुसानिमित्त संदल मिरवणुकीदरम्यान अचानक एक उंट बिथरल्याने मिरवणुकीत एकच गोंधळ निर्माण झाला. यावेळी पिसाळलेल्या उंटाने समीरवर हल्ला करून थेट त्याचा गळाच आपल्या जबड्यात पकडला. मिरवणुकीतील नागरिकांनी उंटाच्या तावडीतून कशीबशी समीरची सुटका केली व त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उंटाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या समीरला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
परभणीत तुराब उल हक बाबाच्या उरुसाचा शुभारंभ शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाला. संध्याकाळी उरुसानिमित्त संदल मिरवणुकीचे आयोजन केले होते. मात्र, एरवी शांत प्राणी समजल्या जाणाऱ्या उंटाने मिरवणुकीदरम्यान मुलाचा बळी घेतल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.


























































