श्रीलंकेत जनतेचा उठाव – हजारो संतप्त नागरिकांची राष्ट्रपती भवनावर चाल; राष्ट्रपती गोटाबाय राजपक्षे देश सोडून पळाले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जीवनावश्यक वस्तूंचा प्रचंड तुटवडा, आकाशाला भिडलेली महागाई, उद्ध्वस्त झालेली अर्थव्यवस्था यामुळे अक्षरशः बरबाद झालेल्या श्रीलंकेत अखेर जनतेने उठाव केला. हजारो संतप्त नागरिकांनी राष्ट्रपती भवन, राष्ट्रपती निवासस्थानावर धडक दिली. या उठावाची चाहूल लागताच राष्ट्रपती गोटाबाय राजपक्षे देश सोडून पळून गेले असून, पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनीही राजीनाम्याची तयारी दाखवली आहे. दरम्यान, श्रीलंकेत अराजक माजली आहे. पोलीस आणि जनतेमध्ये प्रचंड धुमश्चक्री सुरू आहे.

   हिंदुस्थानचा शेजारी देश असलेल्या श्रीलंकेत मार्चपासून अभुतपूर्व परिस्थिती आहे. जनता गेली पाच महिन्यांपासून सातत्याने रस्त्यावर उतरून संताप व्यक्त करीत आहे. मेमध्ये महिंद्रा राजपक्षे यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी रानिल विक्रमसिंघे पंतप्रधानपदी विराजमान झाले. मात्र, जनतेचा उद्रेक कमी झाला नाही. राष्ट्रपती गोटाबाय राजपक्षे यांनी राजीनामा द्यावा, अशी जनतेची मागणी आहे. त्यातूनच आज जबरदस्त उठाव झाला.

चीनकडून तब्बल 7 अब्ज डॉलर कर्ज

श्रीलंकेत राजपक्षे परिवार सर्वांत शक्तीशाली ओळखला जातो. महिंद्रा राजपक्षे हे पंतप्रधान होते, त्यांचे भाऊ गोटाबाय हे राष्ट्रपती, इतर दोन भाऊ अर्थमंत्री आणि संरक्षणमंत्री आहेत. राजपक्षे परिवाराच्या चुकीच्या अर्थनितीमुळे देश बुडाला. श्रीलंकेने चीनकडून तब्बल 7 अब्ज डॉलरचे कर्ज घेतले. पायाभूत सुविधांसाठी कर्ज घेतल्याचे करार केले. मात्र, अनेक प्रकल्प कागदावरच राहिले.

बॅरिकेट्स, गेट तोडून जनता घुसली

राष्ट्रपती गोटाबाय राजपक्षे यांनी राजधानी कोलंबोसह सात प्रांतामध्ये संचारबंदी लागू केली होती. मात्र, संतप्त जनतेने संचारबंदीला जुमानले नाही. हजारो नागरिक राजधानी कोलंबोत रस्त्यांवर उतरले. इतर प्रांतातून रेल्वेमधून लोक कोलंबोत धडकले.

राष्ट्रपती निवासस्थानावर हजारोंचा जमाव चाल करून गेला आणि वेढा टाकला. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडल्या, लाठीहल्ला केला. पोलीस आणि नगरिकांमध्ये धुमश्चक्री उडाली. शेकडो नागरिक, पोलीस जखमी झाले.

बॅरिकेट्स, गेट तोडून लोक राष्ट्रपती भवन, राष्ट्रपती निवासस्थानात घुसले. राष्ट्रपतींच्या राजीनाम्याची मागणी करीत घोषणाबाजी केली. राष्ट्रपती निवासस्थानातील किचनमध्ये, बेडरूममध्ये घुसले. प्रचंड तोडफोड केली. स्विमिंग पूलमध्ये उडय़ा टाकल्या.

श्रीलंकेत अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली असून सैन्यालाही हायअलर्ट ठेवले आहे.

या अभूतपूर्व परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली.

टोमॅटो 320, बटाटा 240 रुपये किलो

श्रीलंका 1948ला स्वतंत्र झाला. त्यानंतर पहिल्यांदा अभूतपूर्व आर्थिक पेच उभा राहिला आहे. अन्नधान्याच्या किंमती 80 टक्क्यांनी वाढल्या. पेट्रोल, डिझेल मिळणे मुश्कील झाले आहे. स्वयंपाकाचा गॅस 3 हजार रुपयांवर गेला.

टोमॅटो तब्बल 320-350 रुपये किलो, नारळ 110 रुपयांना, बटाटा 280, वांगी 240, कांदा 200 रुपये किलो झाला आहे. एक अंडे 30 रुपयांना मिळत आहे. दुधाची भयंकर टंचाई आहे. जनतेची उपासमार होत आहे.

राष्ट्रपतींनी कुठे आश्रय घेतला?

आपल्याविरुद्ध बंडाची चाहूल लागताच राष्ट्रपती गोटाबाय राजपक्षे देश सोडून पळाल्याचे वृत्त आहे. त्यांनी कोणत्या देशात आश्रय घेतला? याचा शोध सुरू आहे. चीनमध्ये आश्रय घेण्याची शक्यता जास्त आहे.