फुप्फुस, किडनीसह हृदयाच्या जखमांमुळेच अनिकेत कोथळेचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फुप्फुस, हृदय, किडनीसह शरीरातील इतर अवयवांना जखमा झाल्यामुळेच अनिकेत कोथळे याचा मृत्यू झाल्याची साक्ष डॉ. वैभव सोनार यांनी न्यायालयासमोर नोंदविली. प्लॅस्टिकच्या काठीने पोट, छातीवर मारल्यानेही मृत्यू होऊ शकतो, असेही डॉ. सोनार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, उलटतपासणीवेळी बचाव पक्षाचे वकील आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यात शाब्दिक चकमकी उडाल्या.

अनिकेतच्या अर्धवट जळालेल्या शारीरिक अवयवाचे विच्छेदन डॉ. वैभव सोनार यांनी केले होते. त्यांची साक्ष बुधवारी न्यायालयासमोर झाली. यावेळी विशेष सरकारी वकील ऍड. निकम यांनी घेतलेल्या सरतपासणीत डॉ. सोनार यांनी अनिकेतच्या मृत्यूचे कारण सांगितले. अनिकेतच्या अर्धवट जळालेले अवयव आणि रासायनिक तज्ञांच्या तपासणीनंतर डॉ. सोनार यांनी अनिकेतच्या मृत्यूचे नेमके कारण नमूद केले होते. साक्षीच्या वेळीही त्यांनी याबाबत स्पष्टता दिली. फुप्फुस, हृदय, किडनी या अवयवांना झालेल्या जखमांमुळेच अनिकेतचा मृत्यू झाला असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

बचाव पक्षातर्फे ऍड. प्रमोद सुतार, ऍड. विकास पाटील आणि ऍड. गिरीश तपकिरे यांनी साक्षीदार डॉ. सोनार यांना कोंडीत टाकणारे सवाल केले. यावेळी त्यांच्या काही सवालांवर ऍड. निकम यांनी जोरदार आक्षेप घेतल्याने दोन्ही बाजूंच्या वकिलांमध्ये शाब्दिक चकमकी उडाल्या. या दरम्यान ऍड. निकम यांनी लाल रंगाचा प्लॅस्टिक पाईप समोर घेऊन या पाईपने मारहाण केल्यानंतर एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो, हे डॉ. सोनार यांच्या माध्यमातून न्यायालयासमोर आणले.

या खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात असून, पुढील सुनावणी 19 आणि 20 मे रोजी होणार आहे. यावेळी या प्रकरणाचे प्रमुख तपासी अधिकारी, राज्य गुन्हे अन्वेषणचे तत्कालीन पोलीस उपाधीक्षक मुकुंद कुलकर्णी यांची साक्ष नोंदवली जाणार आहे.