
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ईडी कोठडी संपल्याने त्यांना आज सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. सत्र न्यायालयाने त्यांना 29 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे पुढील 14 दिवस त्यांना आर्थररोड तुरुंगात काढावे लागणार आहेत.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचे आरोप केले होते. त्यानंतर ईडीकडून त्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. समन्सनंतरही देशमुख अनेक महिने ईडीसमोर हजर झाले नव्हते. नोव्हेंबरमध्ये ईडीसमोर हजर झाल्यानंतर त्यांची मॅरेथॉन चौकशी करण्यात आली. त्यानंतर 2 नोव्हेंबर रोजी त्यांना अटक करण्यात आली. त्यांनी न्यायालयीन कोठडी मागिल्यानंतरही न्यायालयाने त्यांना ईडीच्या मागणीनुसार त्यांना ईडी कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले होते. ईडीची कोठडी संपल्यानंतर सत्र न्यायालयाने आज देशमुख यांना 29 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले.
घरचे जेवण नाहीच
अनिल देशमुख यांचे वय व त्यांना असलेले आजार लक्षात घेता घरचे जेवण मिळावे, अशी विनंती त्यांचे वकील अनिकेत निकम यांनी केली होती. परंतु, न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळली. न्यायालयाने त्यांना आधी तुरुंगातील जेवण खाण्यास सांगितलेय. ते योग्य नसल्यास विचार करू, असेही म्हटलेय. मात्र, न्यायालयाने तुरुंगात स्वतंत्र बेड ठेवण्याची परवानगी दिली आहे.

























































