बीडवर शिवसेनेचाच भगवा फडकणार, अनिल जगताप यांचा निर्धार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीड विधानसभा मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. शेकडो शिवसैनिकांनी जीवाचे रान करून घरावर तुळशीपत्र ठेवून या मतदार संघाची बांधणी केली आहे. शिवसेनेचा आवाज बुलंद ठेवला आहे. अलीकडच्या काळात अनेकांना दुपारचे स्वप्न पडत आहेत. त्यांचे स्वप्न मुंगेरीलालचे स्वप्न ठरणार असल्याचा घणाघात टोला शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी लगावला आहे.

बीड जिल्ह्यात शिवसेना- भाजप युती असतांना समान जागा होत्या. मात्र दिवंगत मुंडे साहेबांच्या आग्रहाखातर शिवसेनेने आपल्या जागा भाजपला देत फक्त बीड विधानसभा मतदार संघ शिवसेनेकडे ठेवला होता. या मतदार संघात शिवसेनेने आपले वर्चस्व नेहमीच सिद्ध केले आहे. तीन वेळा शिवसेनेचा आमदार म्हणून या मतदार संघात भगवा फडकला आहे, शेकडो शिवसैनिकांनी आपल्या जीवाची बाजी लावून, घरावर तुळशीपत्र ठेवून हा मतदार संघ बांधला आहे. तमाम शिवसैनिकांची बीड मतदार संघावर निष्ठा आणि आत्मीयता आहे. शिवसेना आणि बीड हे एक ऋणानुबंध आहेत, असं जगताप यावेळी म्हणाले.
जगताप पुढे म्हणाले की, शिवसैनिकाच्या घामाने आणि रक्ताने येथे कडवे हिंदुत्व निर्माण झाले आहे. मात्र अलीकडे बीडचा आमदार होण्याचे वेध अनेकांना लागले आहेत. त्यांनी खुशाल स्वप्न बघावे मात्र शिवसेनेचा नामोल्लेख करू नये, असं जगताप यावेळी म्हणाले.

दोन वेळा पराभव झालेल्या शिवसेनेला बीडची जागा मिळणार नाही ती भाजपकडे येणार असे भाजपा म्हणत आहे तर महायुतीत विनायक मेटे यांच्यासाठी बीडची जागा शिवसंग्रामला सुटली आहे, असा दावा मेटे समर्थक करत आहेत. भाजप आणि शिवसंग्राममध्ये बीड च्या जागेवरून वाद पेटला असला तरी बीड मध्ये हजारो शिवसैनिक कामाला लागले आहेत. बीडची जागा मिळवण्यासाठी धडपड करणाऱ्यांना आम्ही सांगू इच्छितो की बीडवर शिवसेनेचाच भगवा फडकणार आहे, असे माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी निर्धाराने म्हटले आहे.