
‘टीम इंडिया’चा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी प्रदीर्घ काळापासून क्रिकेटपासून दूर आहे. त्यामुळे इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आगामी टी-20 क्रिकेट स्पर्धेतील कामगिरीवरच महेंद्रसिंग धोनीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भवितव्य अवलंबून असेल, असे मत ‘टीम इंडिया’चे माजी कर्णधार आणि माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी व्यक्त केले.
इंग्लंडमधील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर विश्रांतीवर गेलेला महेंद्रसिंग धोनी अद्याप ‘टीम इंडिया’त परतलेला नाही. त्यामुळे आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेत धोनीला संधी मिळणार की नाही याबाबतची उत्सुकता टिपेला पोहोचली आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलताना फिरकीपटू अनिल कुंबळे म्हणाले, अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनी ‘आयपीएल’च्या 13व्या सत्रात कसा खेळतो यावर संघनिवड समितीचे लक्ष असेल. धोनीचे वाढते वय लक्षात घेता ‘टीम इंडिया’ला त्याची किती गरज आहे, याबद्दलही विचारमंथन होईल. त्यामुळे सध्या तरी महेंद्रसिंग धोनीच्या पुनरागमनाबद्दल अंदाज बांधणे योग्य ठरणार नाही, असे स्पष्ट मत कुंबळे यांनी व्यक्त केले.
बळी मिळविणाऱया गोलंदाजाची गरज!
टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी बळी टिपणारे गोलंदाज अधिक फायदेशीर ठरतात. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने अशा गोलंदाजांवर लक्ष केंद्रित करायला हवे. कुलदीप यादव व युजवेंद्र चहल हे या पठडीतील फिरकी गोलंदाज आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडूऐवजी वेगवान गोलंदाजाला स्थान मिळायला हवे.
अनिल कुंबळे





























































