रिसॉर्टप्रकरणी अनिल परब यांच्यासह चौघे निर्दोष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणात शिवसेना नेते, आमदार अ‍ॅड. अनिल परब व अन्य चार जणांची येथील जिल्हा न्यायालयाने नुकतीच निर्दोष मुक्तता केली आहे. येथील जिल्हा न्यायालयात आमदार अनिल परब, ग्रामसेवक अनंत कोळी व मंडळ अधिकारी सुरेश पारदुळे तसेच माजी महसूल प्रांत अधिकारी देशपांडे, मुरुड येथील सरपंच सुरेश तुपे या सर्वांविरुद्ध खेड जिल्हा न्यायालयात कलम 420 तसेच 120, 177, 182, 290, 34, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम 12, 13, 14 नुसार गुन्हा दाखल होता.

सरकार पक्षाचा आरोप होता की, इमारत पूर्ण नसताना कर आकारणी करून शासनाची फसवणूक केली तसेच खरेदीखतामध्ये इमारत खरेदी करूनसुद्धा त्यावर स्टॅम्प दिला नाही. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवला. सीआरझेड या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये व्यावसायिक रिसॉर्टचे बांधकाम केले. अकृषी परवानगी घेताना खोट्या सह्या केल्या. विजेचा मीटरदेखील खोट्या व बनावट कागदपत्राद्वारे घेतला, परंतु अ‍ॅड. सुधीर बुटाला यांनी जमीन आणि बांधकाम हे वेगवेगळे घटक असल्याचे स्पष्ट केले. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरून आमदार अनिल परब, मुरुडचे सरपंच सुरेश तुपे, ग्रामसेवक अनंत कोळी, सुधीर पारदुळे (मंडळ निरीक्षक, मुरुड दापोली), जयराम देशपांडे (प्रांत अधिकारी, महसूल विभाग, दापोली) यांची निर्दोष मुक्तता केली. याकामी अ‍ॅड. सुधीर बुटाला यांनी अनिल परब यांच्यामार्फत काम पाहिले.