
चिपळूणात आलेल्या महापुरामध्ये बाधित झालेल्यांना तातडीने मदत करण्यात येत आहे. पुरामध्ये अडकलेल्या लोकांची 25/25 जणांच्या समुहाने सुटका करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात 25 जणाना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. पुरबाधितांच्या सावर्डे आणि खेड येथे तात्पुरत्या निवाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पाणी आणि अन्नाच्या पाकिटांचेही वाटप करण्यात येत आहे. एनडीआरएफचे पथक थोड्याच वेळात चिपळूणात पोहोचत आहे. कस्टम, कोस्टगार्डच्या प्रत्येकी दोन आणि पोलीस, जिल्हा प्रशासन आणि चिपळूण नगरपरिषदेच्या 4 अशा एकूण 6 बोटीचा वापर बचावकार्यासाठी केला जात असल्याची माहिती रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पूराची घटना घडताच पालकमंत्री अँड. अनिल परब यांनी तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. अन्न व पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचे नियोजन केले. त्यानंतर पत्रकार परिषदेत पालकमंत्री अनिल परब म्हणाले की, मोठ्या प्रमाणात झालेली अतिवृष्टी, समुद्रातून आलेले उधाण आणि कोळकेवाडी धरणातून करण्यात आलेले विसर्ग या तिन्ही गोष्टी एकाच वेळी घडल्यामुळे चिपळूणात पूर आला. ही घटना घडताच तातडीने मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. नागरीकांना वाचवण्याचे काम सुरु असून आताच आलेल्या माहितीनुसार 25 जणांची सुटका करण्यात आली आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीम घटनास्थळी दाखल होतील. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे स्वतः संपर्कात आहेत असे परब यांनी सांगितले. यावेळी कोकण आयुक्त विलास पाटील, आमदार राजन साळवी, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड़, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग उपस्थित होते.
कोळकेवाडी धरणाचे तीन दरवाजे उघडले – जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील
कोळकेवाडी धरणाच्या वरील परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे धरणातील पाणी साठ्यामध्ये वाढ झाली. पहाटे चार ते पाचच्या दरम्यान धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाला. धरणाचे तीन दरवाजे उघडले गेले. त्याची माहिती आम्हाला तात्काळ देण्यात आली होती. त्यामुळे आम्ही उपाययोजना सुरु केल्या. सध्या आम्ही कोळकेवाडी धरणाच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. जोपर्यंत धरणाच्या वरील भागामध्ये पावसाचे प्रमाण कमी होत नाही तोपर्यंत विसर्ग सुरुच राहील. ज्यावेळी पाऊस कमी होईल त्यावेळी धरण सुरक्षित पाणी साठ्याच्या पातळीवर आल्यानंतर विसर्ग थांबेल. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी सांगितले की, आम्हाला रात्री माहिती मिळाल्यानंतर पूरक्षेत्रातील पूल आणि महामार्गावरील धोकादायक ठिकाणांवरील वाहतूक थांबवली. त्यानंतर तीस जणांची एक तुकडी तयार करून पाठवली.
बचावकार्य सुरू
चिपळूण शहरात आज पहाटेपासून पूराला सुरुवात झाली. चिपळूण नगरपरिषदेच्या दोन बोटींच्या मदतीने तातडीने मदतकार्य सुरु झाले. त्यानंतर रत्नागिरीमधून पोलीस विभागाकडील एक बोट, तटरक्षक दलाची एक बोट अशा तीन बोटी बचावकार्यासाठी पाठवण्यात आल्या. मदत करण्यासाठी तटरक्षक दलाकडील हेलिकॉप्टरची मदत घेण्याचे प्रयत्न सुरु झाले. बचाव केलेल्या नागरीकांसाठी तात्पुरत्या निवासाची व्यवस्था सावर्डे येथील शैक्षणिक संस्थेमध्ये आणि खेडमधील नागरीकांची व्यवस्था जवळपासच्या शाळांमध्ये करण्यात आली आहे.
शेल्टर उभारणीवर भर देणार
नैसर्गिक आपत्तीच्या वेळी आपदग्रस्तांना स्थलांतरीत करण्याकरीता तात्पुरत्या निवास व्यवस्थेची गरज लागते. ही गरज ओळखून आम्ही भविष्यात अशा प्रकारची निवासव्यवस्था उभारणार आहोत. यापूर्वी काय झाले की कोणी निवारा व्यवस्था उभारली नाही. त्यामुळे भविष्यात आम्ही निवारा व्यवस्था उभारण्यावर भर देणार आहोत.






























































