14 दिवसांची मुदत हवी! मंत्री असल्याने कार्यक्रम आधीच ठरलेत, अनिल परब यांचे ईडीला पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस पाठवून 31 ऑगस्ट रोजी चौकशीसाठी बोलावले होते. मात्र अनिल परब यांनी ईडीला पत्र पाठवून पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे उपस्थित राहू शकत नसल्याचे कळवले आहे. उपस्थित राहण्यासाठी 14 दिवसांची मुदत मिळावी, त्याचप्रमाणे चौकशी नेमकी कशासाठी आहे, हेही कळविण्यात यावे, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

ईडीला पाठविलेल्या पत्रात अनिल परब यांनी उपस्थित न राहण्यामागचे कारण नमूद केले आहे. ते या पत्रात म्हणतात, मी मंत्री आणि एक लोकसेवक असल्याने माझे कार्यक्रम हे 15 दिवसांपूर्वीच ठरले होते. माझे ठरलेले कार्यक्रम हे रद्द करता येणार नाहीत. त्यामुळे मला हजर राहता येणार नाही.

कोणत्या प्रश्नी चौकशी करणार, माहिती द्या!

आपण जे समन्स मला बजावले आहे त्यात आपण नमूद केलेलं नाही की, कोणत्या विषयासंबंधी आपण मला चौकशीसाठी बोलावलं आहे. आपण कोणत्या प्रश्नी चौकशी करणार आहात याचीदेखील माहिती द्यावी. जेणेकरून त्यासंबंधी आवश्यक गोष्टी मी आपल्यापुढे सादर करू शकेन, असे अनिल परब यांनी या पत्रात म्हटले आहे.