
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
घरासमोर आणि शेतात बांधलेली जनावरे चोरी करणाऱ्या राज्यस्तरीय टोळीचा ग्रामीण गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. चोरलेली जनावरे खाटकांना विक्री करणाऱ्या या चार चोरट्यांकडून पोलिसांनी एक बैल, 30 हजारांची रोख रक्कम, दुचाकीसह बोलेरो वाहन जप्त केले. 11 जणांच्या या टोळीने संभाजीनगरसह धाराशिव, जालना, सोलापूर आणि बीड जिल्ह्यातील जनावरांची चोरी केल्याची कबुली दिली आहे.
संभाजीनगरातील ग्रामीण भागात जनावरे चोरीचे प्रमाण वाढले आहे. जनावरे चोरणाऱ्या चोरट्यांनी करमाड येथून अशोक बागल यांचे तीन बैल तसेच वडोदबाजार येथील रंगनाथ कोंडके यांची एक म्हैस आणि बिडकीन येथील योगेश लोखंडे यांचा एक बैल चोरी झाल्याने संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे यांच्याकडे देण्यात आला होता. फुंदे यांना बीड जिल्ह्यातील गेवराई येथील बेलगावमधील बाळू ऊर्फ सोमनाथ उमाजी माळी (32) हा साथीदारांच्या मदतीने जनावरे चोरून विक्री करीत असल्याचे समजले. त्यावरून फुंदे यांच्या पथकाने गेवराई येथून बाळू यास ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने 11 साथीदारांच्या मदतीने ग्रामीण भागातून जनावरे चोरी केल्याची कबुली दिली. त्यावरून पोलिसांनी ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली श्रावण माळी (24), अविनाश ऊर्फ अवी फुलसीताराम जाधव (24) आणि सोपान ऊर्फ गोट्या अशोक धनगर (20) या चौघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून एक बैल, दोन बैल विक्रीतून आलेली ३० हजारांची रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, बोलेरो वाहन असा एकूण दोन लाख ७६ हजारांचा ऐवज जप्त करत करमाड पोलिसांच्या हवाली केले. सध्या हे चौघे पोलीस कोठडीत आहे.
जनावरे चोरणारी राज्यस्तरीय टोळी
जनावरे चोरणाऱ्या टोळीचा बीड जिल्ह्यातील बाळू ऊर्पâ माळी हा मास्टर माइंड असून, त्याने जनावरे चोरण्यासाठी चक्क 11 जणांची टोळीच तयार केली होती. ही टोळी दुचाकीने गोठे आणि शेतवसाहतीत टेहळणी करून दुसऱ्या दिवशी डाव साधत होती. या टोळीने संभाजीनगरसह धाराशीव, सोलापूर, बीड, जालना, येथून जनावरे चोरी करून ती गंगाखेड येथील बाजार कमिटीच्या माध्यमातून खाटकांना विक्री केल्याचे समोर आले आहे. या टोळीतील सात जण हे फरार असून त्यांच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली असल्याचे भागवत पुंâदे यांनी सांगितले.



























































