
>> अंजुषा पाटील
कविता हा मराठी साहित्य क्षेत्रातला महत्त्वाचा प्रकार आहे. कवितेतून कवी व कवयित्री आपल्या भावभावनांची अभिव्यक्ती करत असतात. ‘चांदण्यांच्या तळाशी’ हा माधुरी देव यांचा काव्यसंग्रह. यात 63 कविता आणि 11 अभंग आहेत. मंदिराच्या गाभाऱयात एक तेजस्वी दिव्याची वात मंद तेवत राहावी, सगळीकडे पिवळा धमक प्रकाश पसरत जावा अशा या कविता रसिक वाचकांशी जणू संवाद साधतात. ‘चांदण्यांच्या तळाशी’ या कविता संग्रहात चांदण्यांच्या तळाशी ही पहिलीच कविता वाचकांचे लक्ष वेधून घेते.
उतू गेलं चांदणं मनभर, अर्थ गर्भ शब्दांचे मुलायम
उच्चार आले कानावर…
उतू जाणारं चांदणं आणि आभाळ यावरून कवयित्रीच्या कल्पनाशक्तीची भरारी दिसून येते. मनातील उत्कट भावना काव्यातून व्यक्त होतात. ‘एक नदी वाहते’ या कवितेत नदी माझ्यातून मला शोधत सतत वाहत येते असा आशय आहे.
‘बे मोसमी पावसात’ या कवितेत पावसाचे वर्णन झरझर वाचकांच्या डोळय़ासमोरून जाते. ‘ पत्र’, ‘स्त्राrमन’, ‘सांज सरताना’, ‘माहेर’, ‘चूल’, ‘बहिणाबाई आठवताना’ या विशेष आवडलेल्या कविता. मधुमने अंतर्गत 11 अभंग या कविता संग्रहात आहेत. ‘माणसा’ या अभंगात माणसाला बोध केला आहे. ‘कृतज्ञ’ या अभंगातही श्रद्धा ढळू न देता चित्ती सद्वृत्ती ठेवून जे देवाने दिले आहे त्यात समाधान मानावे असं कवयित्री सांगतात.
‘दिलेस जेवढे । त्यात समाधान
राहो अवधान । मधु म्हणे लाल
कवयित्री चांदण्यांच्या तळाचा विचार करत मानवी जीवनातील अनेक भावभावना स्पर्श करतात.
हरवले स्वप्न, झिरपले मनभर, शोधत रात्रभर
चांदण्यांच्या तळाशी जागे, तुझे माझे घर…
या ओळी चांदण्यांच्या तळाचा जणू ठाव घेतात. माणसांवर आणि निसर्गावर प्रेम करत खोल अर्थ असलेले शब्द यांचा सुंदर गोफ म्हणजे हा कविता संग्रह आहे.





























































