
‘विधानसभा उपाध्यक्षपदावर असल्याने आता व्यवस्थित वागले पाहिजे,’ या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सल्ल्याला अण्णा बनसोडे यांनी केराची टोपली दाखविल्याचे समोर आले आहे. अण्णा बनसोडे आणि कुख्यात गुन्हेगार आकाश मोहोळ ऊर्फ आक्या बॉण्ड हे एकमेकांना केक भरवत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा 4 मे रोजी वाढदिवस होता. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. मात्र, कुख्यात गुन्हेगार आक्या बॉण्ड हा अण्णा बनसोडे यांच्यासाठी चक्क केक आणि पुष्पगुच्छ घेऊन आला. यावेळी अण्णा बनसोडे आणि आक्या बॉण्ड यांनी एकमेकांना केक भरवत वाढदिवस साजरा केला. त्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. आक्या बॉण्ड हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध तब्बल 16 गंभीर गुन्हे दाखल आहेत. ‘मोक्का’अंतर्गत कारागृहात असणाऱया आक्याची नुकतीच जामिनावर सुटका झाली आहे.