अण्णा भाऊ साठे यांची कन्या शकुंतला सपताल यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकशाहीर कॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या द्वितीय कन्या शकुंतला सपताल यांचे रविवारी पहाटे नालासोपारा येथील रुग्णालयात निधन झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या. ब्रेनस्टोक आल्यामुळे गेले काही दिवस त्या रुग्णालयातच उपचार घेत होत्या. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात संजय, राजेश, प्रशांत ही मुले, मुलगी नंदिनी आणि नातवंडे असा परिवार आहे.

शपुंतलाबाई बालपणी कम्युनिस्ट पक्षाच्या बाल संघात व सांस्कृतिक कला पथकात सक्रिय होत्या. पक्षाच्या मुखपत्रांची विक्री करण्यातही त्या आई कॉ. जयवंताबाई साठे यांच्यासह आघाडीवर असत. अण्णा भाऊ साठे चिराग नगरात भूमिगत असताना पोलिसांचा ससेमिरा चुकवून कम्युनिस्ट पक्षाचे साहित्य त्या गुपचूप त्यांच्यापर्यंत पोहोचवत. शकुंतलाबाईंचा विवाह अण्णा भाऊ साठे यांनी इस्लामपूर येथील अजित सपताल यांच्याशी करून दिला होता. अण्णा भाऊ साठे यांच्या निधनानंतर शकुंतलाबाईंनी त्यांच्याविषयी काही दिवाळी अंकांत लेखनही केले होते.