
अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या घनघोर युद्धामुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची झोप उडाली आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवण्याचे श्रेय खाती जमा असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अण्णांनी पत्र लिहून शांततेसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे.
अमेरिका, इस्रायलने इराणवर लादलेल्या युद्धाचे जबरदस्त हादरे संपूर्ण जगाला बसत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 15 टक्क्यांनी भडकल्या आहेत. दोन्ही बाजू इरेला पेटल्याने युद्ध कधी थांबणार याचे उत्तर कुणाकडेही नाही. युद्धामुळे निर्माण झालेल्या तणावामुळे अनेक देशांची झोप उडाली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचेही मन युद्धामुळे सामान्य नागरिक, महिला आणि लहान मुलांवर होणाऱ्या परिणामामुळे हळहळले आहे. भारतीय संस्कृती अहिंसेचा आदर्श सांगणारी आहे. भारताने जगासमोर संवाद आणि शांततेचा मार्ग पुढे करावा, असे अण्णांनी पत्रात म्हटले आहे.






























































