जागृत मतदार हाच लोकशाहीचा आधार – अण्णा हजारे

836
anna-hazare

राज्य आणि राष्ट्राच्या विकासाची चावी निवडणुकीसाठी उभे राहिलेल्या उमेदवाराच्या हातात नसून ती चावी मतदारांच्या हातात आहे. उमेदवारांच्या हातात देशाच्या विकासाची चावी आहे असे लोकांना वाटत असेल तर स्वातंत्र्याच्या 73 वर्षानंतरही देशाची ही अवस्था होण्याचे कारण काय? जागृत मतदार सदृढ व निकोष लोकशाहीचा आधार आहे. राज्य आणि राष्ट्राला बदलण्याची चावी मतदारांच्या हातामध्ये असूनही मतदार ते चावी लावण्यास विसरले आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.

एक नोट मिळाली की मतदार भ्रष्टाचारी, गुंड, सरकारी तिजोरीची लुट करणारा, व्यभीचारी उमेदवाराला आपले मत देतो. यामुळे विधानसभा व लोकसभा सारख्या पवित्र मंदीरामध्ये कलंकीत व भ्रष्टाचारी उमेदवार निवडून जातात. हे लोक राज्य आणि देशाचे भविष्य कसे घडविणार? यामुळे मतदारांनी विचार करण्याची गरज आहे. भारत मातेची शपथ घेऊन प्रतिज्ञा करायला हवी की मी निवडणूकीमध्ये भ्रष्टाचारी, गुंड, लुटारू, व्यभिचारी उमेदवाराला माझे अमुल्य मत देणार नाही. जो उमेदवार चारित्र्यशिल आहे, समाज आणि राष्ट्राच्या भल्यासाठी दिव्यासारखा रात्रंदिवस जळत आहे, जनतेची सेवा करणार्‍या उमेदवारालाच माझे मत देईल. ही चावी मतदारांनी लावली तर राज्य आणि देश बदलेल. आज राजकारणातील अनेक उमेदवार भ्रष्टाचार केल्यामुळे वेगवेगळ्या जेलमध्ये गेलेले आहेत. याला जबाबदार मतदार आहे. मतदार कोणत्याही आमिषाला बळी न पडता राज्य, राष्ट्र आणि समाजाच्या भल्यासाठी सेवाभावाने काम करणार्‍या उमेदवाराला आपले मत दिले असते तर बदल घडला असता. असे उमेदवार जेलमध्ये गेले नसते, असेही अण्णा पुढे म्हणाले.

मतदारांनी 1857 ते 1947 या 90 वर्षाच्या काळात स्वातंत्र्यासाठी ज्या लाखो लोकांनी बलिदान केले त्यांचे स्मरण करून आपले मत सेवाभावी उमेदवारालाच द्यावे, असे आवाहन अण्णा हजारे यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या