
इराणशी कोणत्याही प्रकारचा व्यापार करणाऱ्या देशांवर २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. हा निर्णय तत्काळ लागू होणार आहे. हिंदुस्थानलाही याचा काही प्रमाणात फटका बसणार आहे.
‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा केली. हा निर्णय अंतिम आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. अण्वस्त्रांच्या मुद्द्यावरून इराण आणि अमेरिकेमध्ये तीव्र मतभेद आहेत. मागील वर्षीच्या जून महिन्यात इस्रायल व अमेरिकेने इराणमधील अणू प्रकल्पांवर हल्ले केले होते. मात्र इराणने आपला अणू कार्यक्रम सुरूच ठेवला आहे. त्यामुळे ट्रम्प संतापले आहेत.
सरकारविरोधी आंदोलनाला पाठिंबा
इराणमध्ये महागाईच्या मुद्द्यावरून तेथील सरकारविरोधात उग्र निदर्शने सुरू आहेत. ट्रम्प यांनी या निदर्शकांना पाठिंबा जाहीर केला आहे. ‘‘हे आंदोलन असेच सुरू ठेवा. देशातील संस्था ताब्यात घ्या. तुम्हाला लवकरच मदत दिली जाईल,’’ असे आवाहन ट्रम्प यांनी केले आहे.

























































