अमली पदार्थविरोधी कृती दलातील अधिकाऱ्यांना अटकेचे अधिकार, गृह विभागाचा मोठा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील अमली पदार्थ विव्रेत्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी राज्याच्या गृह विभागाने मोठे पाऊल उचलले आहे. अमली पदार्थविरोधी कृती दलातील पोलीस उपनिरीक्षक आणि त्यावरील सर्व अधिकाऱ्यांना ड्रग्ज तस्करांना थेट अटक करण्याचे अधिकार बहाल करण्यात आले आहेत.

राज्यात गेल्या काही वर्षांत अमली पदार्थांचे जाळे प्रचंड वाढले आहे. पान-सिगारेटच्या टपऱ्यांवर ड्रग सध्या सहजपणे उपलब्ध होत असल्याचे पडसाद विधिमंडळाच्या अधिवेशनातही उमटले होते. शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी प्रश्नोत्तराच्या तासात मुंबईतील अमली पदार्थ सेवन व विक्रीबाबत सभागृहाचे लक्ष वेधले होते. त्यावर उत्तर देताना राज्यातील वाढत्या अमली पदार्थांच्या तस्करीच्या विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक पावले उचलत प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र अमली पदार्थ विरोधी युनिटची स्थापना करण्याची घोषणा केली होती. अमली पदार्थांच्या तस्करीमधील आरोपींवर मकोका लावण्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृह विभागाने या संदर्भातील राजपत्र जारी केले आहे.