
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी कश्मीरी पंडितांच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. आई दुलारी खेर हिला कश्मीरमध्ये पुन्हा स्वत:चं घर हवं आहे, असे अनुपम खेर म्हणाले. एका इंग्रजी वेबसाईटशी कश्मीरमधून कलम 370 हटवल्याच्या निर्णयाबाबत बोलताना त्यांनी हे विधान केले आहे. तसेच सरकारने घेतलेला निर्णय आमच्यासाठी (कश्मीरी पंडितांसाठी) खूपच महत्तपूर्ण आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
1990 मध्ये कश्मीरमधून ज्या कश्मीरी पंडितांना हाकलून देण्यात आले होते, त्यामध्ये खेर यांच्याही कुटुंबाचा समावेश होता. याच्या आठवणी आणि जखमा ताज्या आजही खेर यांच्या मनात घर करून आहेत. याच संदर्भात बोलताना खेर म्हणाले की, ‘आम्हाला मुळासकट उखडून टाकण्यात आले होते. त्यामुळे तेथून (कश्मीर) कलम 370 हटवण्याचा निर्णय आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. माझी आई नेहमीच याबाबत चर्चा करायची. कारण तिचे बालपण आणि तरुणपण कश्मीरमध्येच गेले. माझ्या आयुष्यातील 20 वर्ष मी उन्हाळ्याची सुट्टी तेथे घालवली आहे. माझे काका-काकू, आजी-आजोबा आणि आई-वडील तेथे राहात होते.’
ते पुढे म्हणाले की, माझी आई आजही म्हणते की मला कश्मीरला पुन्हा जायचं आहे, तिथे स्वत:च्या घरात पुन्हा रहायचं आहे. ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना थकत नाही. आता आपण पुन्हा कश्मीरमध्ये जावू आणि तिथे आपले घर पुन्हा बनवू, अशी इच्छा ती बोलून दाखवते. ती जिवंत असेपर्यंत तिची इच्छा पूर्ण होईल अशी आशा आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
आठवणींना दिला उजाळा
कश्मीरी पंडियांना घराबाहेर हाकलून दिल्याच्या घटनेचा उल्लेख करताना खेर म्हणाले की, ही फक्त एक घटना नाही तर आमचे अस्तित्व संपवण्याचे शडयंत्र होते. एखाद्या भाडेकरूला घरातून हाकलून दिल्याचीही ती घटना नव्हती. पंडियांनी राहत्या घरातून हाकलून देण्यात आले होते. हजारो पंडियांनी 19 जानेवारी, 1990 च्या रात्री राहते घर सोडावे लागले होते. त्या जखमेचे व्रण आजही आमच्या मनावर कायम आहेत. कधीकधी जखम भरते, परंतु त्याच्या दु:खद आठवणी कायम स्मरणात राहतात, असेही ते म्हणाले.
























































