
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
मॉब लिंचिंगच्या म्हणजेच जमावाने ठेचून मारण्याच्या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त करणारे एक पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहण्यात आले आहे. यात देशातील 49 प्रथितयश व्यक्तींचा समावेश असल्याचं कळते आहे. अनुराग कश्यप, मणिरत्नम, अदूर गोपालकृष्णन या सारख्या नामवंत दिग्दर्शकांनीही या पत्रावर सही केली आहे. अल्पसंख्यकांना जमावाकडून ठेचून मारण्याच्या घटना या गंभीर बाब असून अशा घटना रोखण्यासाठी त्वरीत उपाययोजना कराव्यात अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
या पत्रामध्ये मुसलमान, दलित आणि इतर अल्पसंख्यकांचे मॉब लिंचिंग तातडीने थांबवण्याची गरज असल्याचे लिहिले आहे. राष्ट्रीय गुन्हे अहवालातील आकड्यांचा हवाला या पत्रामध्ये देण्यात आला आहे, ज्यात म्हटलंय की
- 1 जानेवारी 2018 ते 29 ऑक्टोबर 2018 दरम्यान धर्माच्या नावाखाली 91 लोकांची हत्या करण्यात आली
- यात मुसलमानांची संख्या जास्त आहे
- अल्पसंख्यकांना मारहाणीच्या 90 टक्के घटना पंतप्रधान मोदी सत्तेत आल्यानंतर घडल्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉब लिंचिंगच्या घटनांमुळे आपण व्यथित झालो असल्याचे संसदेत सांगितलं होतं. मात्र आपले या उत्तरामुळे समाधान झाले नसून असा गुन्हा करण्याविरोधात काय कारवाई करणार आहात ? हे तुम्ही सांगायला हवे अशी पत्राद्वारे मागणी करण्यात आली आहे. हा गुन्हा अजामीनपात्र बनवण्यात यावा तसेच आरोपीला पॅरोल न देता जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात यावी अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे.



























































