एपीआय प्रशांत कणेरकर यांनी आत्महत्येपूर्वी लिहिली होती सुसाईड नोट

1027

अलिबाग येथे तीन महिन्यांपूर्वी बदलीवर आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कणेरकर (50) यांनी पोलीस मुख्यालयातील अधिकारी विश्रामगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना 16 ऑगस्ट रोजी रात्री घडली. प्रशांत कणेरकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. मात्र त्यात काय लिहिले आहे याबाबत पोलिसांनी गुप्तता ठेवलेली आहे. त्यामुळे या प्रकरणात सुसाईड नोट मधील मजकूर कळल्यानंतर आत्महत्येचे कारण स्पष्ट होणार आहे. मात्र या घटनेने जिल्हा पोलीस दल हादरून गेले आहे.

जिल्हा मुख्यालयातील अधिकारी विश्रामगृहात प्रशांत कणेरकर यांच्या रूमची 16 ऑगस्ट रोजी साफसफाई करण्यासाठी कर्मचारी गेले असता त्यांनी दरवाजा उघडला नाही. त्यामुळे ते झोपले असतील म्हणून सफाई कामगार निघून गेले. कणेरकर यांना फोन करण्याचा प्रयत्न केला मात्र ते फोनही उचलत नव्हते. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात संपर्क करून माहिती दिली. त्यानंतर अलिबाग पोलीस दाखल झाल्यानंतर दरवाजा तोडून आत गेले. त्यावेळी कणेरकर हे रूममधील फॅनला गळफास लावून लटकलेले दिसले.

समोरचे दृश्य पाहून पोलीसही हबकले. त्यानंतर मृतदेहाचा पंचनामा केला. त्यावेळी प्रशांत कणेरकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. सुसाईड नोट पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. मात्र त्यात मजकूर काय आहे हे पोलिसांनी गुलदस्त्यात ठेवले आहे. सुसाईड नोट कणेरकर यांच्या कुटुंबाला दाखविल्यानंतर त्याबाबत पुढील पावले उचलली जातील, असे जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी सांगितले. प्रशांत कणेरकर यांनी 16 ऑगस्ट रोजी सकाळीच आत्महत्या केली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कणेरकर यांच्या मृतदेहाचे जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर आज 17 ऑगस्ट रोजी मुंबई दादर येथे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. पोलीस उपनिरीक्षक सागर कावळे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. मात्र आत्महत्या का केली याचे कारण अजूनही अस्पष्ट आहे.

आपली प्रतिक्रिया द्या