
सामना प्रतिनिधी । लखनौ
उत्तर प्रदेश पोलिसांचे भयंकर ‘एन्काऊंटर’ पुन्हा देशासमोर आले आहे. केवळ संशय आला आणि गाडी थांबविली नाही म्हणून पोलिसांनी थेट ऍपल कंपनीच्या मॅनेजरच्या डोक्यात गोळी घातली. या हत्येमुळे योगी आदित्यनाथ सरकार वादात अडकले आहे.
ही घटना शुक्रवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास येथील गोमतीनगरात घडली. ऍपल कंपनीचे एरिया मॅनेजर विवेक तिवारी हे आयफोन लाँचिंगचा कार्यक्रम संपल्यानंतर आपल्या कारने घरी जात होते. पोलिसांनी कार थांबविण्याचा इशारा केला. त्यावेळी विवेक तिवारी आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. तेवढ्यात पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत चौधरी याने थेट विवेक यांच्या डोक्यात गोळी घातली. कार चालवणारा तरुण संशयित वाटत होता. त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला पण तो थांबला नाही. उलट पोलीस कॉन्स्टेबलच्या बाईकवर कार घालण्याचा प्रयत्न केला. त्याने कार पुढे नेली. तेवढ्यात गोळी झाडल्याचा आवाज आला. कार विजेच्या खांबावर आदळली. विवेक यांचा मृत्यू गोळी लागून झाला की खांबावर आदळल्यामुळे याचा तपास सुरू असल्याचे लखनौचे सहाय्यक पोलीस आयुक्त कलानिधी नैथानी यांनी सांगितले. विवेक तिवारी यांचा मृत्यू डोक्यात गोळी लागल्यामुळे झाल्याचे डॉक्टरांनी शवविच्छेदन केल्यानंतर सांगितले.

























































