पत्रप्रपंचाचे कौतुक! निकेत पावसकर यांचे अक्षरघर पाहून चित्रकार राज शिंगे भारावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील सुप्रसिद्ध चित्रकार राज शिंगे यांनी नुकतीच तळेरे येथील संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्या अक्षरघराला भेट दिली. या वेळी पोस्ट कार्डवर घेतलेल्या संदेश पत्राच्या आगळ्यावेगळ्या संकल्पनेचे शिंगे यांनी काैतुक केले. तसेच हे अक्षर प्रदर्शन कला रसिकांना कायमस्वरूपी पाहायला मिळावे, अशी इच्छा व्यक्त केली.

राज शिंगे आणि माणिक शिंगे यांच्या चित्रांची राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शने होतात. पावसकर यांच्या ‘अक्षरघरा’चे काैतुक करताना राज शिंगे म्हणाले, ‘‘संदेश पत्र संग्रह जोपासण्यामागची कल्पना नावीन्यपूर्ण आहे. विशेष म्हणजे या संग्रहाचे अत्यंत कष्टपूर्वक केलेले जतन वाखाणण्याजोगे आहे. आपण जतन केलेला हा खजिना अनमोल असून हा ठेवा असाच जपा. भविष्यात त्याला निश्चितच मोल प्राप्त होईल.

काय आहे अक्षरघरात?

निकेत पावसकर यांच्या अक्षरघरामध्ये पोस्ट कार्डवर देश-विदेशातील नामवंत व्यक्तींचे संदेश आहेत. यात जागतिक कीर्तीचे खेळाडू रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड), मुहम्मद युनूस (बांगलादेश), आयर्लंडचे पंतप्रधान-सिंधुदुर्ग जिह्याचे सुपुत्र डॉ. लिओ वराडकर, युरोपियन सेंट्रल बँकेचे चेअरमन मारिओ ड्राघी (जर्मनी), हॉलीवूड निर्माता, अभिनेता-दिग्दर्शक सर मायकेल केन (लंडन), अभिनेता जॅकी चेन, अमेरिकन मॉडेल- अभिनेत्री कॅरोल अल्ट, नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ डॉ. अभिजीत बॅनर्जी (अमेरिका) आदी सेलिब्रेटींच्या पत्रांचा समावेश आहे.