दुष्काळग्रस्त भागातील अर्चनाची मोठय़ा पडद्यावर भरारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकांकिका, नाटक, लघुपट अशा प्रत्येक पायरीवर स्वतःला सिद्ध करत रुपेरी पडद्यावर झळकण्याचं अनेकांचं स्वप्न असतं, पण खूप कमी कलाकारांच्या नशिबी तो क्षण येतो. नगर जिह्यातील एका छोटय़ाशा खेडय़ातून आलेल्या अर्चना महादेव या हरहुन्नरी अभिनेत्रीच्या वाटय़ाला मात्र हे भाग्य आले आहे. खडतर परिस्थितीवर मात करीत अर्चनाने जिद्दीने हे यश खेचून आणलं आहे. तिची मुख्य भूमिका असलेले आणि अनेक पुरस्कारांवर आपली मोहर उमटवलेले ‘घोडा’ आणि ‘मसुटा’ हे दोन चित्रपट फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित होत आहेत.

बालपणीच पितृछत्र हरवलेल्या अर्चनाचा सांभाळ तिच्या आईने  शिवणकाम करून केला.  आईच्या कष्टाचे चीज करणाऱया अर्चनाने आजवर अनेक एकांकिका, नाटके आणि लघुपटांतून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची माने जिंकली आहेत. तसेच तिने पडद्यामागे लेखन, संकलन आणि दिग्दर्शन विभागातही आपल्या कामाचा अमिट ठसा उमटवला आहे.

दोन्ही चित्रपटांतील माझ्या भूमिका या फार वेगळ्या आहेत. मात्र, जन्म गावचा असल्यामुळे खऱया जीवनात वाटय़ाला आलेला संघर्ष या भूमिका करताना खूप महत्त्वाचा ठरला, अशा भावना अर्चनाने व्यक्त केल्या. अर्चनाची मुख्य भूमिका  असलेल्या  ‘घोडा’   चित्रपटाला दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवात ‘बेस्ट ज्युरी
अवॉर्ड’, तर ‘मसुटा’ चित्रपटाला  विविध महोत्सव, पुरस्कार सोहळ्यात प्रेक्षक आणि समीक्षकांची पसंती मिळाली आहे.