मालवणी गोडवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> संजीवनी धुरी-जाधव

कोकणातील एक मुलगी. अर्चना परब. तिच्या मायबोली मालवणीला जगाच्या व्यासपीठावर नेण्याचे स्वप्न पाहतेय.

काय गो…बरा आसय मा…मुंबईसून कधी ईलय… मालवणी भाषेचे हे शब्द कानावर पडले की मस्त वाटतं. अगदी गावी असल्याचे फिल येतं. पण ही गमतीदार भाषा गावात गेल्यावरच कानावर पडते. अन्य ठिकाणी ही भाषा आपल्याला कुठे दिसत नाही. पण मडुरा- सावंतवाडीच्या एका तरुणीने मालवणी भाषा जगभर पोहोचवण्याचा ध्यासच घेतला आहे. त्यासाठी ही तरुणी आपल्या मालवणी स्वॅगच्या माध्यमातून मालवणी भाषेचा जागर करते., ही तरुणी म्हणजे सावंतवाडी-मडुरा गावातील अर्चना परब.

अर्चना ही व्यवसायाने डिझायनर आहे, पण मालवणी भाषेवर तिचं नितांत प्रेम आहे. मडुऱयात ती लहानाची मोठी झाल्याने तिला तिच्या गावाबद्दल अतोनात प्रेम असल्याचे ती सांगते. तिला तिच्या लिखाणातून जुने शब्द, मालवणी संस्कृती, आपले सण आणि आपली रुढी-परंपरा, तिथल्या लोकांचे दैनंदिन जीवन कसं असतं ते सगळं पोचवण्याचा प्रयत्न असतो. तिला मालवणी भाषेविषयी विचारले असता ती सांगते, मालवणी भाषेत जेवढी मजा आहे तेवढी अन्य कुठेच नाही. तिच्या लिखाणाची सुरुवात झाली ती मुंबईत आल्यावर, जेव्हा ती मुंबईत आली तेव्हा तिच्या ऑफिसमधले अन्य भाषिक त्यांच्या त्यांच्या भाषेत न लाजता बोलायचे; पण आपण मालवणीत कोणाशी बोलायचे असा प्रश्न निर्माण व्हायचा. अशावेळी  ‘आम्ही मालकणी’ फेसबुक पेज ला जॉईन झाले. तिथे सगळे मालवणीत बोलायचे. बऱयाच गोष्टी शेअर करायचे. त्यामुळे अगदी गावापासून जवळ असल्याचे जाणवायचे. मग हळूहळू मलाही तिथे लिहावेसे वाटू लागले आणि  मी मालवणीत लिहायला सुरुवात केली. मला माझ्या गावाबद्दल जे वाटतं ते मी शब्दात मांडत गेले. लोकांना ते आवडू लागले. त्यांना त्यांच्या गावाजवळ नेल्यासारखे वाटायचे. त्यानंतर मला कळलं की, माझ्यासारखी अनेक लोकं आहेत त्यांना मालवणी भाषा, आपले गाव याच्याविषयी प्रेम आहे. मग मी मनाशी निश्चय केला की, मी मालवणीतच लिहिणार. साधारण दोन वर्षांपूर्वी मी कविता करू लागले. माझे विषय हे गावी सध्या काय सुरू असेल त्यावर असतात. त्यामुळे लोकांना त्याविषयी माहिती मिळते आणि ज्यांना माहीत नसेल त्यांनाही कळते. माझे सगळे लिखाण पोस्ट करण्यापुरतेच असायचे. त्याचे मी जतन केले नव्हते. अशावेळी गुप्र मधील काही लोंकानी फेसबुक पेज तयार करण्याचा सल्ला दिला आणि मग मी ‘मालवणी स्वॅग’ नावाने पेज सुरू केले आणि त्याला बरेच फॉलोअर्स लाभले. तिथे लिहीतानाच प्राजक्ता सांमत ह्यानी लेख लिहुन मालकणी ब्लॉगर ही ओळख करून दिली.  त्यानंतर एका वृत्तपत्रात मालवणीत लेखमाला लिहायचे. या सगळ्या प्रकासात ‘आम्ही मालकणी’ आणि ‘माझा सिंधुदुर्ग’ ह्या दोन्ही गुप्रचे खुप मोठे योगदान असल्याचे अर्चना आवर्जुन सांगते.

भाषेमुळे नवीन ओळख

मालवणी भाषेत लिहिताना मी नवीन शब्द न वापरता मुद्दामहून तिथे जुना शब्द लिहीते. अर्थ समजला नाही तर लोक विचारतात. ते शब्द वापरतात. डिझायनर होते तेव्हा मला कोणीच ओळखत नव्हते, पण मालवणीमुळे खरी ओळख मिळाल्याचे अर्चना सांगते.

जुनी लोक हिच डिक्शनरी

लोक मला मालवणीची डिक्शनरी म्हणतात. काही त्यांना अडलं की त्या शब्दाचा अर्थ मला विचारतात. त्यामुळे मला अपडेट राहावे लागते. माझ्यासाठी मालवणी भाषेची शब्दसंपत्ती म्हणजे आपली जुनी माणसं. गावी दोन-तीन आजी आहेत. त्यांच्याकडून मला बरेच शब्द सापडतात. गावाला गेले की सगळ्यात आधी मी माझ्या नानीच्या बाजूला जाऊन बसते. आधी गावी जायचे तेव्हा फक्त माणसांशी बोलायचे, पण आता मी गावी गेल्यावर दोन माणसे बोलत असताना ऐकत असते, त्यांचे निरीक्षण करत असते. माझी आई ही देखील माझ्यासाठी एक डिक्शनरीच आहे. मी आज जे काही लिहिते ती तिच्यामुळेच लिहिते, तिचे अनुभव लिहिते. मालवणीसारख्या म्हणी, मार्मिक गाणी, त्यांच्या ओव्या, शेतातली गाणी अफलातून आहेत. त्यामुळे हे सगळे मिळवण्यासाठी ऐकणे आणि चौकस राहणे गरजेचे असते. कारण मालवणीसाठी काही गुगल ऑप्शन नाही आहे. त्यामुळे ही जुनी माणसे हीच आपली डिक्शनरी असल्याचे अर्चना म्हणते.

मालवणी स्टॅण्डअप

माझ्या लिखाणातून जुने शब्द, मालवणी संस्कृती, सण, रीती-परंपरा, तिथल्या लोकांचे दैनंदिन जीवन हे सगळं पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते. अलीकडे लोक वाचण्यापेक्षा बघण्याकडे जास्त महत्त्व देतात. त्यामुळे सध्या ‘कॅज्युअल मालवणी’ या यूटय़ुब चॅनलसाठी मी मालवणी एपिसोड करतेय. गणेशोत्सवापूर्वी एक मालवणी स्टॅण्डअपचा प्रयत्न केला,तो व्हिडीओ तुफान वायरल झाला.. त्याची स्क्रीप्ट मीच बनवली होती. त्यामुळे भविष्यात मालवणीला पुढे न्यायचे आहे एवढेच स्वप्न आहे. त्यासाठी माझ्या लिखाणातून सातत्याने प्रयत्न करेन असेही ती सांगते.

– [email protected]