अर्जेंटिनाचा लुकास ठरला विजेता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विश्वाचा राजा-ओमकार बालमित्र गणेशोत्सव मंडळ-दादर (पश्चिम), आयडियल स्पोर्ट्स ऍकॅडमी आणि इन्स्टिटय़ूट फॉर चेस एक्सलंट यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त झालेल्या खुल्या विश्वाचा राजा ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेत अर्जेंटिनाचा इंटरनॅशनल मास्टर लुकास लायस्कोव्हीच विजेता ठरला. लुकासने 14 पैकी सर्वाधिक 12 साखळी गुण नोंदवून अजिंक्यपदाला गवसणी घातली. रशियाच्या इंटरनॅशनल मास्टर ग्रीन ऍरोने 11.5 गुणांसह द्वितीय तर गुजरातच्या कर्तव्य अनाडकटने 11 गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला. या स्पर्धेत हिंदुस्थानसह रशिया, अर्जेंटिना, झेक प्रजासत्ताक, तुर्कमेनिस्तान आदी देशांच्या विख्यात आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित 72 बुद्धिबळपटूंसह दोन ग्रँडमास्टरदेखील स्पर्धेत सहभागी झाले होते.

तामीळनाडूच्या इंटरनॅशनल मास्टर एम. प्रणेशने (10.5 गुण) चौथा, तुर्कमेनिस्तानच्या इंटरनॅशनल मास्टर सापर्म्यरट अटाबयेव्हने (10 गुण) पाचवा, झेक प्रजासत्ताकच्या आंद्रेई मॅटसेन्कोने (9.5 गुण) सहावा, आंध्र प्रदेशच्या फिडे मास्टर श्रीहरीने (9.5 गुण) सातवा, अर्जेंटिनाच्या फिडे मास्टर मॅन्युएल क्रिस्टोबलने (9 गुण) आठवा, आसामच्या गोब्लुकने (9 गुण) नववा तर कोलकाताच्या राजदीप सरकारने (8.5 गुण) दहावा क्रमांक मिळविला. मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ संघटना सहकार्याने झालेल्या स्पर्धेत विजेत्या-उपविजेत्यांना एकूण 42 रोख पारितोषिके देण्यात आली. स्विस लीग पद्धतीने लीचेस प्लॅटफॉर्मवर 14 साखळी फेऱ्य़ांमधील सामने रंगतदार झाले. अरेना इंटरनॅशनल मास्टर राजाबाबू गजेंगी, इंटरनॅशनल आर्बिटर प्रेम पंडित आदी प्रमुख पंचांच्या मंडळास शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण, ओमकार बालमित्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सल्लागार प्रकाश शेट्टी, राजन राणे आदी मंडळीचे सहकार्य लाभले होते. सदर उपक्रम यशस्वी होण्यासाठी ओमकार बालमित्र गणेशोत्सव मंडळाचे सल्लागार प्रकाश शेट्टी, क्रीडाप्रेमी गोविंद मोहिते, समाजसेवक एकनाथ संगम, समाजसेविका अक्षदा तेंडुलकर, राजन राणे, रवींद्र आरोसकर, ओमकार चव्हाण, ऋषी केसरकर, अभिजित गोठणकर, समीर महाडिक, विजय महाडिक, राहुल वनगे, मंदार डाखरे, शंकर चड्दार यांनी मेहनत घेतली.