​निलंगामध्ये फिल्मी थरार! तांबळा येथील क्लबवर सशस्त्र दरोडा, पोलिसांच्या गाडीला धडक देत तीन आरोपी पसार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

​निलंगा तालुक्यातील कासार शिरसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या तांबळा येथील ‘ब्रिकयार्ड कार्ड क्लब’वर सशस्त्र दरोडा पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बंदूक आणि तलवारीनिशी आलेल्या टोळीने क्लबमध्ये धुमाकूळ घालत एकावर तलवारीने जीवघेणा हल्ला केला. या घटनेनंतर पळून जाणाऱ्या आरोपींनी पोलिसांच्या गाडीला धडक देत फिल्मी स्टाईलने हुलकावणी दिली. पोलिसांनी पाठलाग करून एका आरोपीला बेड्या ठोकल्या असून तीन जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले आहेत.

​मिळालेल्या माहितीनुसार, तांबळा येथील ब्रिकयार्ड क्लबवर अचानक आलेल्या हल्लेखोरांनी शस्त्रांचा धाक दाखवत दहशत निर्माण केली. यावेळी झालेल्या वादात आरोपींनी एका व्यक्तीवर तलवारीने सपासप वार केले, ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. या थरारादरम्यान आरोपींकडून गोळीबार करण्यात आल्याचीही परिसरात चर्चा आहे, मात्र पोलीस प्रशासनाने अद्याप याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

घटनेची माहिती मिळताच कासार शिरसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड, उपनिरीक्षक अजय पाटील आणि त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. आरोपी पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा गाडीतून पळून जात असल्याचे समजताच पोलिसांनी खासगी वाहनांच्या मदतीने नाकाबंदी केली. पाठलाग सुरू असताना आरोपींनी पोलिसांच्या वाहनाला धडक दिली आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला.

या झटापटीत पोलिसांनी जिवाची पर्वा न करता एका आरोपीला जागीच झडप घालून ताब्यात घेतले. मात्र, गाडीतील इतर तीन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. या पथकात पोलीस कर्मचारी किशोर तपसे, राजू हिंगमिरे, श्रीहरी डावरगावे, आबासाहेब इंगळे, मनोज चव्हाण आणि प्रताप गर्जे यांचा समावेश होता. या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पसार झालेल्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी परिसरात ‘कोंबिंग ऑपरेशन’ राबवण्यास सुरुवात केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण निलंगा तालुक्यात खळबळ उडाली आहे.