
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पाकिस्तानला वठणीवर आणण्यासाठी आमच्याकडे सर्व पर्याय खुले असल्याचा खणखणीत इशारा आज लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी दिला. इन्फंट्री दिनाच्या निमित्ताने शहीद जवानांना श्रद्धांजली वाहताना रावत यांनी कश्मीरातील फुटीरवाद्यांनाही जोरदार खडे बोल सुनावले. दरम्यान, गुरुवारी दगडफेकीत जखमी झालेल्या राजेंद्रसिंह या जवानाचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. रस्त्याची सुरक्षा करणाऱया जवानांवर दगडफेक करणाऱया फुटीरतावाद्यांबद्दल सहानुभूती कशाला व्यक्त करायची, असेही लष्करप्रमुख म्हणाले.
कश्मीरात सीमा सुरक्षा दलाचे एक पथक रस्त्याच्या कामावर सुरक्षेसाठी तैनात होते. याच पथकात राजेंद्रसिंह (22) हा जवानदेखील होता. गुरुवारी सायंकाळी बांधकाम विभागाच्या अधिकाऱयांचा काफिला अनंतनाग बायपासवरून जात असताना फुटीरतावाद्यांनी त्यावर जोरदार दगडफेक केली. एक दगड राजेंद्रसिंह यांच्या डोक्याला लागला. गंभीर अवस्थेत त्यांना लष्कराच्या रुग्णालयात हलवण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. राजेंद्रसिंह हे उत्तराखंडातील रहिवासी असून 2016 मध्ये लष्करात भरती झाले होते. त्यांच्या पश्चात आईवडील आहेत. लष्करी मुख्यालयात राजेंद्रसिंह यांना लष्कराच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर पार्थिव त्यांच्या गावाकडे रवाना करण्यात आले.
जवानांवर दगडफेक करणाऱ्यांना दहशतवादी का मानू नये?
नवी दिल्लीत इन्फंट्री दिनाच्या निमित्ताने लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी अमर जवान ज्योतीवर शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी बोलताना बिपिन रावत यांनी फुटीरतावाद्यांचा चांगलाच समाचार घेतला. ज्या जवानाला दगड लागला तो कश्मिरी जनतेसाठी बनवण्यात येणाऱया रस्त्याची सुरक्षा करत होता. फुटीरवाद्यांच्या दगडफेकीत जवान शहीद झाला आहे आणि अजूनही काही लोक दगडफेक्यांबद्दल सहानुभूती बाळगून असल्याबद्दल रावत यांनी संताप व्यक्त केला. रस्ते उभारणाऱ्या जवानांवर दगडफेक करून त्यांचा बळी घेणाऱया फुटीरतावाद्यांना ‘दहशतवादी’ का मानू नये, असा सवालही लष्करप्रमुखांनी यावेळी केला.
summary- army chief bipin rawat warns pakistan

























































