
हिंदुस्थानी लष्करातील एका जवानाने पाकिस्तानी महिला एजंट्सला लष्कराची गोपनीय माहिती पुरवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दोन सुंदरींच्या जाळ्यामध्ये अडकून या जवानाने लष्करातील माहिती लीक केल्याचा आणि पैसे घेतल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणी शासकीय गोपनीय माहिती अधिनियम 1923 च्या अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
राजस्थान पोलिसांच्या इंटेलिजन्स विंगने लष्करातील जवानाला अटक केली आहे. शांतिमय राणा असे अटक केलेल्या जवानाचे नाव असून तो पश्चिम बंगालमधील बागुंडा जिल्ह्यातील कंचनपूर गावचा रहिवासी आहे. राजस्थानमधील जयपूर येथील अर्टलरी युनिटमध्ये तो तैनात होता. त्याच्यावर हेरगिरी आणि लष्कराची गोपनीय माहिती पाकिस्तानी एजंटला पुरवल्याचा आरोप लावण्यात आला आहे.
राजस्थान पोलिसांच्या इंटेलिजन्स विंगचे डायरेक्टर जनलर उमेश मिश्रा यांनी याबाबत माहिती दिली आहे. पाकिस्तानी एजंट गुरनौर कौर उर्फ अंकिता आणि निशाने सोशल मीडियाद्वारे जवानाशी संपर्क साधला होता. दोन महिलांनी राणाचा व्हॉट्सअप नंबर मिळवला आणि त्याच्याशी संवाद साधू लागल्या. दोघींनी आधी राणाचा विश्वास जिंकला आणि त्याच्याकडून लष्कराची गोपनीय माहिती मिळवू लागल्या. यादरम्यान त्यांनी राणाच्या खात्यामध्ये काही रक्कमही ट्रान्सफर केल्याचे समोर आले, असेही मिश्रा यांनी सांगितले.
पोलिसांनी अटक केल्यानंतर राणाने आपण हनीट्रॅपमध्ये कसे अडकत गेलो याचाही खुलासा केला आहे. मार्च 2018 पासून राणा हिंदुस्थानी लष्करामध्ये कार्यरत असून गेल्या काही काळापासून व्हॉट्सअप चॅट, व्हिडीओ आणि ऑडिओ मेसेजद्वारे ते पाकिस्तानच्या महिला एजंट्सच्या संपर्कामध्ये होता.
सदर महिलांनी आपण उत्तर प्रदेशमधील शाहजहांपूर येथील असल्याचे भासवले होते. आपणही मिलिट्री इंजिनिअरिंग सर्व्हीसेसमध्ये कार्यरत असल्याचे एका महिलेने सांगितले होते, तर दुसरीने स्वत:चे नाव निशा सांगत मिलिट्री नर्सिंग सर्व्हीसमध्ये कार्यरत असल्याचे म्हटले होते. या महिलांनी राणाकडून गोपनीय कागदपत्र, फोटो, युद्धाभ्यासाचे व्हिडीओ मागवले होते. हनीट्रॅपमध्ये अडकलेल्या राणाने या महिलांना आपल्या रेजिमेंटची गोपनीय माहिती पुरवली होती.





























































