राधाकृष्ण विखे यांच्या अधिपत्याखाली असलेल्या पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणातील आरोपींना अटक करा; ठेवीदारांचे आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अधिपत्याखाली असलेल्या रावसाहेब पटवर्धन तथा प्रवरा नागरी सहकारी पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी मंगळवारी ठेवीदारांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी विखे यांच्यावर कारवाई करावी असे फलक सुद्धा यावेळी दाखवण्यात आले.

रावसाहेब पटवर्धन तथा प्रवरा नागरी सहकारी पतसंस्थेतील गैरव्यवहारप्रकरणी आरोपी संचालकांना तात्काळ अटक करावी, तसेच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची या प्रकरणात चौकशी करावी, या मागणीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर फलक हातात घेत अॅड. महेश आनंदास यांच्यासह ठेवीदार उपस्थित होते

पतसंस्थेच्या सर्व संचालक आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी तसेच पतसंस्थेचे प्रमोटर संस्थापक महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची या गुन्ह्यात चौकशी करण्यात यावी, अशी मागणी वारंवार करूनही पोलीस खात्याकडून त्याबाबत दुर्लक्ष केले जात असल्याच्या निषेधार्थ 11 जुलै रोजी जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयात अर्धनग्न एकदिवशीय आंशिक उपोषण करण्याचा इशारा संस्थेच्या ठेवीदारांनी दिला होता.

यासंदर्भात रावसाहेब पटवर्धन तथा प्रवरा नागरी सहकारी पतसंस्थेचे ठेवीदार शेख इस्माईल गुलाब व इतर 250 ठेवीदारांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी निवेदन दिले असून, त्यात म्हटले आहे की, ठेवीदारांच्या ठेव रकमेबाबत आर्थिक अपहार व फसवणुकीसंदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात संस्थेचे एकूण सर्व 30 आरोपींविरुद्ध 7 ऑगस्ट 2020 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

या गुन्ह्यातील आरोपींनी अद्यापही अटक करण्यात आलेली नाही. गुन्हा दाखल झाल्यानंतर पटवर्धन पतसंस्थेच्या 13 पैकी 6 आरोपींना अटक झाली, परंतु प्रवरा पतसंस्थेच्या 12 आरोपी संचालकांपैकी एकालाही आजतागायत अटक करण्यात आलेली नाही. तसेच संस्थेचे संस्थापक महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची या गुन्ह्याबाबत वारंवार मागणी करूनही आजतागायत चौकशी करण्यात आलेली नाही. विखे यांनी ठेवीदारांच्या ठेव रकमेचा वापर मुलाच्या लोकसभा निवडणुकीत केला असून, ते पैसे त्यांनी बुडविले आहे.

अद्याप त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही. गुन्ह्यातील आरोपी राजकीय हितसंबंध व पैशाच्या ताकदीवर बिनधास्तपणे नगर शहरात फिरत आहेत. केलेल्या फसवणुकीमुळे ठेवीदारांचे जगणे मुश्कील झाले आहे. आतापर्यंत अनेक ठेवीदार ठेवींचा विचार करून मयत झालेले आहेत. या गुन्ह्यातील आरोपी असलेले जिल्हा उपनिबंधक, प्राधिकृत अधिकारी व इतर सर्व अधिकारी-कर्मचारी यांनीसुद्धा अद्याप अटक करण्यात आलेली नाही. चुकीचे व खोटे ऑडिट करून देणारे ऑडिटर तसेच बोगस कर्जधारक यांच्यावरही अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे पोलीस खात्याच्या कामावर नाराजी व्यक्त करण्याच्या दृष्टीने पोलीस अधीक्षकांच्या दालनात 11 जुलै रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 6 या वेळेत अर्धनग्न एकदिवशीय आंशिक उपोषणास बसण्याचा इशारा ठेवीदारांनी दिला आहे.

यासंदर्भात आरोपींविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई तात्काळ न केल्यास नाईलाजाने पोलिस अधीक्षक व आर्थिक गुन्हे शाखा यांच्याविरुद्ध राज्य पोलिस तक्रार प्राधिकरण मुंबई येथे रितसर तक्रारअर्ज करून न्याय मागण्यात येईल, असे ठेवीदारांचे वकील ऍड. महेश आनंदास यांनी म्हटले आहे.

निवेदनावर तारा रायकर, श्रीकांत कुलकर्णी, भाऊसाहेब लबडे, शब्बीर शेख, अरुण कुलकर्णी, अविनाश ऐलावार, मुनव्वर खान पठाण, नामदेव शिदोरे, उत्तम सत्रे, शोभा कुलकर्णी, तेजश्री खुळगे, बलाराम एक्कलदेवी, बबई जाधव, सुषमा सोनावळे, विमल भालेराव, वैजयंता हुलगे, परशुराम जव्हेरी, देवराम पानमळकर, रमेश मोढवे, टी. ई. भंडारी, रमेश भोडके व शेख इस्माईल यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. संबंधित ठेविदारांनी दिलेल्या इशारा प्रमाणे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले व प्रशासनाच्या निषेधा च्या घोषणा सुद्धा यावेळी देण्यात आला.