
रेकॉर्डवरच्या आरोपीने तरुणीला धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. घडल्याप्रकरणी एकाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. काही दिवसांपूर्वीच तो जेलमधून सुटला होता. जेलमधून बाहेर येताच त्याने हे कृत्य केल्याचे तपासात समोर आले आहे.
पीडित तरुणी ही अंधेरी एमआयडीसी परिसरात राहत असून त्याच परिसरात अटक आरोपी राहतो. त्या परिसरात अटक आरोपीची प्रचंड दहशत आहे. त्या दहशतीमुळे कोणी नागरिक त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार करत नाही. काही दिवसांपूर्वी अटक आरोपी हा जेलमधून बाहेर आला होता. बाहेर येताच त्याने तरुणीला धमकी देत घरी नेले व तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. जर कोणाला काही सांगितल्यास जीवे ठार मारू, अशी धमकीच त्याने त्या तरुणीला दिली. भीतीपोटी त्या तरुणीने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. त्यानंतर तरुणीने हिंमत करून घडलेल्या प्रकाराची माहिती तिच्या कुटुंबीयांना दिली. तरुणीने एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. त्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

























































