
>>अशोक डुंबरे
प्रयोगशील शेतकऱयांचे संशोधन, त्यांचे काम आणि मागर्दर्शन यासाठीही ‘आमची माती आमची माणसं’ हा कार्यक्रम शेतकऱयांमध्ये लोकप्रिय होता. उरळीकांचन येथील सखाराम बापू कांचन हे शेतकरी आणि साहित्यिकही. त्यांची द्राक्ष बागायत, त्यातील वेगवेगळे प्रयोग पाहिले. त्या ओघाने द्राक्ष बागायत शेती, त्यातील आव्हानं, निर्यात धोरण, बाजारभाव, महाराष्ट्र व अखिल भारतीय द्राक्ष बागायतदार संघ, पुणे कृषी महाविद्यालयातील मांजरी येथे द्राक्ष संशोधन केंद्र अशा अनेक गोष्टींशी परिचय झाला.
सखाराम बापू कांचन, मुक्काम पोस्ट उरळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे. हे जुन्या काळातील अत्यंत कष्टाळू मेहनती शेतकरी होते. त्यांची उरळीकांचन तसेच भांडगाव येथे शेती होती. आज ते हयात नाहीत. त्यांचा माझा परिचय असाच झाला होता. ते नंतर माझे चांगले मित्र बनले. यावर्षी द्राक्षाचा हंगाम सुरू झाला. पेपरला बातम्या येऊ लागल्या. म्हणून मला माझ्या या मित्राची आठवण झाली.
त्यांनी उरळीकांचन येथे त्या काळात 70-80 च्या दरम्यान द्राक्ष बागायत शेती केली होती. पूर्वीच्या काळी आतासारख्या फळबाग योजनेद्वारे शेतकऱयाला आर्थिक मदत दिली जात नव्हती. बागायती करण्यासाठी द्राक्ष, ऊस यासाठी शेतकरी राष्ट्रीय बँकांकडून कर्ज घेत असे. चांगले पीक आले, चांगले उत्पन्न आले, बाजारभाव मिळाला तर ती कर्ज परतफेड करणे त्याला शक्य होत असे.
एकदा मी उरळीकांचन येथे जाऊन सखाराम बापूंची मुलाखत घेतली. ते बोलायला स्पष्टवत्ते. कोणाची भीडभाड न बाळगता सत्य सांगणारी व्यक्ती होती. त्यांच्या मुलाखतीचा कार्पाम ‘आमची माती आमची माणसं’ या कार्पामात प्रसारित केला होता. लोकांना तो मनापासून आवडला होता. पण त्यांनी शेतीतील प्रांजळ सत्य सांगितले होते. त्यांनी सांगितले की, द्राक्ष बागेसाठी राष्ट्रीयकृत बँकांचे कर्ज काढून हप्ता भरणे कठीण जातो. कारण द्राक्ष बाग हे नाजूक पीक असते. हवामान बदलले, ढग आले, थंडी पडली की त्याचा पिकावर दुष्परिणाम होतो. खूप थंडी पडली तर द्राक्ष बागेभोवती रात्रीच्या वेळी शेकोट्या पेटवून बागेतील तापमान योग्य ते प्रकारे राखावे लागते. तरच द्राक्ष पिक चांगले येऊ शकते.
कीटकनाशकाच्या फवारणीचा खर्च खूप असतो. औषधे महाग असतात. मजूर मिळत नाहीत. द्राक्ष छाटणी योग्यवेळी करावी लागते. बागेचे पाणी तोडावे लागते. परत योग्य वेळी पाणी सुरू करावे लागते. ही एक कला असते. माहिती सांगताना ते म्हणाले, की द्राक्षाचे मणी तयार होण्यास काही द्रव्यांची फवारणी पण करावी लागते. ही औषधे महागडी असतात. द्राक्षाच्या छाटणीवर द्राक्षाचे पीक सर्वस्वी अवलंबून असते. एकाच वेळी सर्व भाग छाटले जात नाहीत. तर टप्प्याटप्प्याने बागेची छाटणी केली जाते. कारण मग टप्प्याटप्प्याने द्राक्षाचे मणी झाडावर यायला लागतात आणि टप्प्याटप्प्याने बाजारपेठेत द्राक्षे पाठवली जातात. द्राक्ष बाजारात पाठवताना बॉक्समध्ये भरावी लागतात. एक किलो, दोन किलो, चार किलो… असे बॉक्स तयार करावे लागतात. त्यात गवत घालावे लागते. पेपर टाकावे लागतात. पॅकिंग नीट व आकर्षक करावे लागते. मगच ते बाजारात पाठवो जातात. तरच त्याला चांगला बाजारभाव मिळतो. मोठ्या प्रमाणावर द्राक्षाची आवक झाली तर बाजारभाव कमी मिळतो. बाजारात द्राक्ष कधी पाठवायची हीसुद्धा एक कला आहे. ती सर्वांना जमेलच असे नाही. बाजारभाव चांगला मिळाला तरच उत्पन्न येऊन द्राक्ष बागेचा खर्च भरून निघतो. नाहीतर कधी कधी असे होऊ शकते की काढल्या कर्जावर व्याज चालू असते ते थांबत नाही. ते द्यावेच लागते. तुम्हाला बाजारभाव मिळो न मिळो, बँकेला त्याचे सोयरसुतक नसते असे स्पष्ट मत सखाराम बापूंनी आपल्या मुलाखतीत सांगितले.
विशेष म्हणजे सखाराम बापू कांचन हे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध लाडके साहित्यिक होते आणि पु. ल. देशपांडे यांचे मित्र होते. बापू पुण्याला त्यांच्याकडे अधूनमधून जात असत. जाताना आपल्या शेतातला वानवळा घेऊन नेहमी जात असत. तसेच पु. ल. देशपांडे सखाराम बापूंच्या घरी अनेक वेळा गेले आहेत. त्यांची शेती पण पाहिली आहे. त्यांच्या घरी अनेकदा जेवणही केले असल्याचे बापूंनी आवर्जून मला सांगितले होते. पुलंनी सखाराम बापूंची मुलाखत आवर्जून पाहिली. त्यानंतर एकदा मी पांच्या घरी गेलो असता त्यांनी त्या मुलाखतीचा आवर्जून उल्लेख केला. असा स्पष्ट बोलणारा शेतकरी असावा. उगीच प्रसिद्धीच्या मागे लागून काही सांगू नये असे मत त्यांनी व्यक्त केले होते. मलाही त्यावेळी खूप समाधान वाटले की, ‘आमची माती आमची माणसं’ कार्पाम पु. ल. देशपांडेंसारखी व्यक्तिमत्त्वे पाहतात हे एक प्रकारचे माझे कौतुकच होते. आता हे दोघेही हयात नाहीत. परंतु त्या आठवणी नेहमी स्मरणात राहतील.
सखाराम बापू कांचन यांचे एक चिरंजीव म्हणजे सोपान कांचन एक कृषी पदवीधर असून ते पदवीधर झाल्यापासून आपल्या शेतीत व्यस्त झाले. शेतीमध्ये अनेक प्रयोग केले आणि प्रगतिशील शेतकरी म्हणून नावाजलेले आहेत. ते महाराष्ट्र राज्य बागायतदार संघाचे अध्यक्ष होते. महाराष्ट्रातील द्राक्ष पिकलेल्या बागायतदार शेतकऱयांसाठी एक संघटना वर्षभर काम करत असते. शेतकऱयांचे द्राक्षसंबंधी अडचणी, द्राक्षाची बाजारपेठ, द्राक्षाची निर्यात यासंबंधी ही संघटना शेतकऱयांना मदत करते तसेच मार्गदर्शन करते. आता सोपान कांचन हे अखिल भारतीय द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष आहेत. ही संस्था भारतातील शेतकऱयांसाठी द्राक्ष बागेच्या प्रश्नावरती काम करते आणि मदत करते. महाराष्ट्रातील द्राक्ष बागायतदार संघाचे एक अधिवेशन वर्षातून भरते. याला हिंदुस्थानातून निवडक शेतकरी आणि महाराष्ट्रातील द्राक्ष बागायतदार आवर्जून येतात. या परिसंवादात शेतकरी कृषी तज्ञ भाग घेतात आणि अडचणींवर कशी मात करता येईल याचा सल्ला देतात.
मी ‘आमची माती आमची माणसं’ कार्पाम करताना दरवर्षी द्राक्ष बागायतदार संघाचा मेळावा दूरदर्शनसाठी चित्रित करत होतो आणि त्याचा तीस मिनिटांचा दूरदर्शन वृत्तांत दरवर्षी मुंबई दूरदर्शन केंद्रावरून प्रसारण करत होतो. विशेष म्हणजे माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारसाहेब ह्या अधिवेशनास आवर्जून उपस्थित राहतात. ते दहा वर्षे केंद्रामध्ये कृषीमंत्री असताना त्यांनी या संघटनेला शेतकऱयांना त्यांची द्राक्ष निर्यात व्हावीत तसेच स्थानिक बाजारभाव योग्य प्रकारे मिळावेत यासाठी भारत सरकारच्या कृषी खात्यातर्फे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आणि राबविलेसुद्धा होते.
द्राक्षे समशीतोष्ण, व्यावसायिक पीक आहे. तसेच शेतकऱयांना आर्थिक फायदा मिळवून देणारे पीक आहे. द्राक्षे आरोग्यदायी फळ आहे. द्राक्षामध्ये ए आणि सी विटामिन आहे तसेच अॅंटीऑक्सिडेंट हा गुणधर्म द्राक्षामध्ये असल्यामुळे त्याला खूप महत्त्व आहे. हिंदुस्थानातून द्राक्षे मोठ्या प्रमाणावर निर्यात होतात. 267950 :39 मेट्रिक टन द्राक्षे जगात निर्यात होतात. त्याची किंमत 2543 : 42 कोटी रुपये इतकी आहे. म्हणजे इतके परकीय चलन आपल्या देशाला द्राक्षापासून मिळते. हे आकडे 20, 22, 23 सालातील आहेत. साधारणत: आपला देश नेदरलँड, बांगलादेश, युनायटेड अरब, युके, रशिया या देशांना द्राक्षे निर्यात करतो. सर्वात जास्त द्राक्ष निर्यात नाशिक जिह्यातून होते.
द्राक्षाचा इतिहास पहिला तर हे फळ मोगलकाळापासून आढळून येते. परंतु हिंदुस्थानात खऱया अर्थाने द्राक्ष लागवडीचा प्रसार पुणे कृषी महाविद्यालयातून झाला. तेव्हा ते महाराष्ट्र शासनाच्या कृषी खात्याअंतर्गत होते. डॉ. चिमा साहेब नावाचे गृहस्थ हॉर्टिकल्चर विभागात काम करत होते. त्यांनी पुण्यातील कृषी महाविद्यालयातील मोदी बाग तसेच गणेश खिंड फळबाग संशोधन केंद्रावर संशोधन करून एक जात शोधून काढली. ती जात ‘चिमा साहेब’ म्हणून ओळखली जाते. त्यांनी संशोधन करून ही जात प्रचलित केली होती.
आपल्या देशातील ही पहिली जात आहे जी शेतकऱयांमध्ये पूर्वी प्रसिद्ध होती. या संशोधनाला चिमा साहेब यांनी महत्त्वपूर्ण प्रयत्न करून ही जात शेतकऱयांच्या शेतात आणली. पुण्याजवळ मांजरी येथे द्राक्ष संशोधन केंद्र आहे. त्या केंद्राला ‘चिमा ग्रेप नॅशनल इन्स्टिट्यूट’ असे नाव दिलेले आहे. तेव्हाचे हॉर्टिकल्चरिस्ट डॉ. चिमा साहेब यांच्या आठवणीप्रित्यर्थ तसेच त्यांच्या द्राक्ष संशोधन क्षेत्रातील योगदानासाठी हे नाव त्या केंद्राला देण्यात आले आहे.
(लेखक माजी दूरदर्शन निर्माते आहेत.)


























































