दखल – प्रतिकूलतेच्या अंधारातील दिव्यज्योत

>>अस्मिता येंडे

मराठी साहित्यात स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच विशेषत: 1960 नंतर जे ठळक वाङमयप्रवाह उदयास आले, त्यापैकी ग्रामीण साहित्याचा प्रवाह लक्षणीय आहे. ग्रामीण साहित्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील राहणीमान, तेथील समस्या, जनजीवन, संस्कृती, बोलीभाषा, रूढी- परंपरा यांची ओळख होऊ लागली. सध्या ग्रामीण भागात बऱयाच सोयी उपलब्ध असल्या तरी पूर्वी बरीच असुविधा होती. त्यामुळे खेड़्यापाड्यात आयुष्य व्यतीत करणे आव्हानात्मक होते.

सोलापूर जिह्यातील माढा तालुक्यातील अंजनगावी राहणारे लेखक डॉ. नाना भोंग हे पशुधन विकास अधिकारी म्हणून कार्यरत असून त्यांची ‘साँच’ नावाची कादंबरी मनाला उभारी देणारी संघर्षमय गाथा आहे. एकूण 566 पानांची ही महाकादंबरी दीर्घ स्वरूपात असली तरी त्याचे साहित्यमूल्य व्यापक आहे. ‘साँच’ कादंबरीच्या शीर्षकापासूनच मनात उत्सुकता निर्माण होते. पण संपूर्ण कादंबरीचे सार या दोन शब्दात सामावलेले आहे.

‘साँच’ ही आत्मकथनात्मक कादंबरी असून त्यात लेखकाचे भावविश्व, जगण्यासाठी केलेली धडपड, संघर्ष तसेच अंतर्मनातील संवेदना मांडताना एक प्रकारे लेखकाने सिंहावलोकन केले आहे. ही कादंबरी लेखक स्वत कथन करत आहे, प्रथमपुरुषी निवेदन, ग्रामीण बोलीभाषेचा बाज, विशिष्ट ग्रामीण शब्दयोजना, उत्तम संवादरचना त्यामुळे कादंबरीतील भाव नेमकेपणाने वाचकांपर्यंत पोहोचतो. यातो प्रसंग वाचताना लेखकाच्या कुटुंबाने त्यांच्या शिक्षणासाठी केलेली मेहनत, काबाडकष्टाचे केलेले चित्रण मनाला विषण्ण करणारे आहे. प्रत्येक आई-वडील आपल्या मुलांच्या हितासाठी कष्ट उपसतात. त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून त्यांना अभिमानाचे क्षण प्रदान करणं ही प्रत्येक मुला-मुलींची जबाबदारी आहे, ही गोष्ट या कादंबरीत मला प्रकर्षाने जाणवली.