
>> दिव्या सौदागर
कन्फ्युजन किंवा मनातला गोंधळ हे खूपदा इतरांच्या खिल्लीचे कारण ठरते, पण त्याचा मानसिक आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर ही समस्या समुपदेशनाने वेळीच दूर सारणे आवश्यक आहे.
नताशा (नाव बदलले आहे) तशी स्मार्ट होती. मात्र जे तिला जवळून ओळखायचे त्यांना तिचा स्मार्टनेस हा ओढून ताणून आणलेला आहे हे कळत होतं. कारण स्वतला सिद्ध करण्याच्या नादात तिच्याकडून क्षुल्लक चुका होत आणि इतर म्हणजेच तिच्या मित्रमैत्रिणी तिला सांभाळून घेत. तिचा शाळेतला, कॉलेजमधला आणि आता ती काम करत असलेल्या कंपनीतला असा भरपूर मित्रपरिवार होता. त्यामुळे त्या सर्वांच्या आधाराने ती आतापर्यंत होती.
“आधाराने? मला तुझं वाक्य समजलं नाही’’ समुपदेशनाला आलेल्या नताशाला जेव्हा हे विचारलं गेलं तेव्हा ती खिन्न हसून म्हणाली, “मला नाहीतरी छोटी मोठी डिसिजन्स घ्यायला माझे फ्रेंड्सच लागतात. का? ते मलाही माहीत नाही आणि त्यासाठीच मी इकडे तुम्हाला भेटायला आलेय.’’ नताशाने एका दमात समुपदेशनाला येण्याचं कारण सांगितलं. नताशाला कायमच कुठलीही गोष्ट पटकन आणि ठामपणे ठरवता येत नव्हती. कुठेही जायचं किंवा काही करायचं असेल तर ती गोंधळलेलीच असायची. ‘जाऊ की नको’, ‘करू की नको’ या अवस्थेत असल्यामुळे इतरही मग तिच्या त्या संभ्रमित अवस्थेमुळे गोंधळून जायचे.
नताशा ही शेंडेफळ असल्याने घरात सगळ्यांची लाडकी होती. तिच्यावर तिच्या वडिलांचा भरपूर जीव होता. त्यामुळे तिच्या प्रत्येक खाजगी बाबीमध्ये भरपूर लक्ष घालीत. तिने काहीही ठरवलं तरी ते त्यातून वेगळा पर्याय तरी सुचवत. त्यामुळे तिला कुठलेही निर्णय घेताना संभ्रम व्हायला लागला. कुठेतरी ‘आपल्या वडिलांचं मत महत्त्वाचं. कारण त्यांना कळतंय. कदाचित मला नाही कळणार. नंतर माझं चुकलं तर…बाबांनी मला अलर्ट केलंय. जाऊ दे. त्यांचंच ऐकते…की, काय करू?’ अशा प्रकारचे विचार, स्वगतं यात ती अडकायला लागली. परिणामी ती तिच्या प्रत्येक लहानमोठ्या निर्णयांबाबत त्यांच्यावर आवश्यकतेपेक्षा अवलंबून राहायला लागली. हे तिचं अवलंबित्व एका दिवशी पटकन थांबलं जेव्हा तिच्या वडिलांचा आकस्मिक मृत्यू झाला. तो मानसिक, भावनिक धक्का तिच्यासाठी प्रचंड होता.
त्या धक्क्यातून नताशाने स्वतला सावरलं खरं; पण तिच्यावर त्या प्रसंगाचे दूरगामी परिणाम व्हायला लागले होते. कारण प्रत्येक गोष्टीत तिला बाबा लागायचे. ही पोकळी तिने तिच्या मित्रपरिवारामध्ये शोधली (तिचा मित्रपरिवाराही तिच्या बाबांनी मान्य केला होता). ती स्वतच्या खासगी निर्णयांसाठी त्यांच्यावर अवलंबून राहायला लागली. त्यामुळे झालं असं की, नताशाला स्वतचं असं खाजगी जीवन उरलं नाहीच. शिवाय तिच्या मित्रपरिवारालाही तिच्यात अडकणं म्हणजे एक प्रकारची जबाबदारी आल्यासारखं वाटायला लागलं. त्यातच तिचं लग्न जमलं. त्यावेळी तिने तिच्या आणि होणाऱया जोडीदाराच्या गुजगोष्टी मित्रांमध्ये उघड केल्या. त्यावेळी तिच्या मित्रमैत्रिणींनी जी काही मतं त्या मुलाबाबतीत बनवली त्यानुसार ती त्याच्याशी वागायला, बोलायला लागली. अपेक्षितपणे त्या मुलाने लग्न मोडलं. दुसऱया वेळी असाच काहीसा प्रकार घडला. त्यावेळी मात्र मित्रांनी आणि मैत्रिणींनी तिला समज दिली आणि तिच्या वैयक्तिक निर्णयांची जबाबदारी स्वतवर घ्यायला सांगितली. याही वेळी अचानक आलेली निर्णय घेण्याच्या जबाबदारीने नताशा गडबडली. तिचा हा गोंधळ तिच्या होणाऱया नवऱयाला समजला. त्याला आपल्या भावी पत्नीकडून खंबीरपणा हवा होता. त्यामुळे हेही नातं तुटलं. नताशा त्यामुळे पुन्हा हादरली आणि तिने समुपदेशनाचा मार्ग निश्चित केला. हा निर्णय तिने स्वतहून घेतला होता.
“माझं तुम्ही कन्फ्युजन दूर करा. मला आता डिपेंडेंट राहण्याचा कंटाळा आलाय. माझ्या फ्रेंड्सनी आता मला नाव ठेवलंय ‘कन्फ्युज्ड कॅरॅक्टर’ म्हणून. सर्व माझी काळजी घेतात, पण त्यांचं ते कधीतरी खिल्ली उडवणं, मला सगळ्या गोष्टी शिकवणं या सगळ्या मला आता नको आहेत. प्लीज, मला मदत करा’’ असं म्हणून नताशाने मान खाली घातली.
कन्फ्युजन किंवा मनातला गोंधळ हे खूपदा इतरांच्या खिल्लीचे कारण ठरतं, पण त्याचा मानसिक आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर त्यामुळे व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे त्या व्यक्तीची कौटुंबिक जडणघडण आणि तिच्या आजूबाजूच्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वाचा ती व्यक्ती कसा विचार करते हे घटक महत्त्वाची भूमिका साकारतात. कारण बऱयाचदा त्या घरी कोणाच्या तरी प्रभावाखाली राहतात. मग हा प्रभाव त्यांच्यासाठी इतका प्रखर असतो की, त्या स्वतचा विवेकही वापरत नाहीत. मग जर त्या प्रभावी व्यक्ती त्यांच्या आयुष्यातून काही कारणास्तव निघून गेल्या तर या व्यक्ती स्वतवरचा विश्वास गमावतातच आणि बऱयाच वेळा बाहेर तो प्रभाव (आधार) शोधतात, पण मग अशा वेळी त्या व्यक्तीच्या संपर्कातील इतरांना त्या व्यक्तीचे ओझे वाटू शकते. ‘गोंधळ उडणे’ म्हणजे काय, तर जेव्हा एखादी नवीन गोष्ट शिकण्याची किंवा गुंतागुंतीची बाब सोडवण्यासाठी असलेली असमर्थता. ही असमर्थता आपल्या नेहमीच्या पठडीतल्या किंवा तशाच एकसुरी विचार करण्याच्या पद्धतींमुळे येऊ शकते. उदाहरण द्यायचे झाल्यास कुठलंही नव्या पठडीतील काम करताना किंवा अचानक नवी समस्या आल्यास ‘हे करू की ते करू?’, ‘असं करू की तसं करू’ अशा प्रकारचा उडणारा मनातला गोंधळ हा व्यक्तीला कुठल्याही ठाम विचारांप्रत नेत नाही. कारण त्याच्या पाठी अनामिक भीती, ताण, भविष्यात काही चुकीचं घडल्यास अपराधीपणाच्या भावनेला स्वत तयार नसणं ही सगळी भावभावनांची आंदोलनं व्यक्ती अनुभवत असते. त्यालाच अतिविचार असंही म्हटलं जातं.
यातून जर त्या व्यक्तीला बाहेर पडायचं असेल तर काही मार्ग हे निश्चित आहेत.
स्वत:च्या मनाचा गोंधळ उडतो हे स्वीकारणं.
कुठली समस्या सोडवताना गोंधळ उडतोय याची चाचपणी करणं.
त्या समस्येबाबत महत्त्वाच्या बाबींची (त्याबाबतच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजू) टिपून काढणं.
मग त्या बाजूंचा विचार करून त्याचे परिणामही नोंदवून ठेवणं.
नंतर स्वतसाठी योग्य आणि कमी ताणाचं असं ठरवून मगच निर्णय घेणं आणि आवश्यकता असेल, गरजेचं असेल तर
कुठल्याही एकाच विश्वासू व्यक्तीला घेतलेल्या निर्णयाबद्दल सांगून (गरज असेल तर) फेरविचार करणं.
हे उपाय या व्यक्तींसाठी सुरुवातीला जरी कठीण वाटत असले तरी निश्चितच दूरगामी चांगले परिणाम करतात आणि त्या व्यक्तीला भावनिक आणि वैचारिकदृष्ट्या कणखर, स्वतंत्र बनवतात. नताशाने हे सगळे सांगितलेले उपाय हळूहळू अंगीकारायला सुरुवात केली. अर्थात तिला सुरुवातीला खूपच जड जात होतं. कारण ती आधाराशिवाय कुठल्याही गोष्टी करत नव्हती. मात्र जेव्हा तिने स्वतशी काही गोष्टी ठरवल्या आणि स्वतच्या ‘कन्फ्युज्ड कॅरॅक्टर’मधून बाहेर यायचं ठरवलं तेव्हा हळूहळू गोष्टी तिच्यासाठी सहजसाध्य झाल्या.
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)




























































