
>> प्रा. जयश्री कृ. देशपांडे
स्त्री सक्षमतेचे हे पर्व स्त्रीला आत्मभान देणारं, स्वतंत्र व्यक्ती म्हणून अस्तित्व देणारं आहे. वैचारिक, आर्थिकदृष्टय़ा स्वतंत्र असणाऱ्या स्त्रियांनी समाजातील त्यांचं स्थान अधिक बळकट केले आहे. हे ‘स्व’त्व जपताना तिने कुटुंबाचा अन् समाजाचाही सन्मान राखला पाहिजे.
21व्या शतकात स्त्रियांचे शिक्षणाचे प्रमाण वाढले आणि स्त्राr अनेक बाबतीत सक्षम झाली. आज बहुतांश स्त्रिया या आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी झाल्या आहेत आणि अर्थातच ही अतिशय समाधानाची बाब आहे. स्त्राr जर आर्थिकदृष्टय़ा सक्षम असेल तर तिचा आत्मविश्वास वाढतो. आजूबाजूच्या वातावरणामुळे वैचारिक प्रगल्भता येते. वागण्याबोलण्याचे शिष्टाचार कळतात. महत्त्वाचे म्हणजे आर्थिकदृष्टय़ा इतरांवर अवलंबून राहावे लागत नाही. कुटुंबाचा आर्थिक स्तर वाढल्याने, शिक्षणाचे महत्त्व पटल्याने मुलांना चांगल्या प्रकारचे शिक्षण दिले जाते. कुटुंबात आणि मुख्यत समाजात तिला मानसन्मान मिळतो. थोडक्यात तिचे वेगळे महत्त्व स्वीकारले जाते.
मात्र याचा अर्थ स्त्रीने घरात माझंच वर्चस्व असले पाहिजे असा घेऊ नये. याचं कारण संसार म्हणजे माझं तुझं न करता कुटुंब या संस्थेसाठी असणारी धडपड असते. त्यात पती-पत्नी व इतर कुटुंबीय समान पातळीवर असतात आणि म्हणूनच दुसऱयाचा सन्मान ठेवता आलाच पाहिजे. स्त्रिया शिकल्या म्हणजे सुशिक्षित झाल्या असे ठामपणे म्हणता येत नाही. तुमची वैचारिक पातळी किती उंचावली? समायोजन किती साधता? वडीलधाऱ्यांचा किती मान राखता या गोष्टी कुटुंबसंस्थेत महत्त्वाच्या ठरतात. शिक्षणामुळे समाज सुधारणा झाली असं म्हणताना महत्त्वाचे सकारात्मक बदल आपल्याला दिसतात. हुंडय़ासाठी पूर्वीप्रमाणे स्त्रियांचा छळ होण्याचे प्रमाण खूप कमी झाले. स्त्राr वेगवेगळ्या क्षेत्रांत करीअर करीत असल्यामुळे आर्थिक प्रश्न बराचसा सुटला आहे. सध्या असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे स्त्रीने स्वतला सिद्ध केलेले नाही, जे तिला अनभिज्ञ आहे. उज्ज्वल इतिहासाचा वारसा आपल्याला आहे. पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल, उपमुख्यमंत्री आणि आता तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सरपंच, नगरसेवक, महापौर अशा स्त्रियांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
स्त्रियांच्या यशाचा आलेख कायम चढता आहे, परंतु यशाला गवसणी घालताना जमिनीवरची माती सुटू न देणं हेदेखील तिच्याच हाती आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने स्त्रीचं अस्तित्व दर्शविताना काही बदल ठळकपणे दिसतात. ते म्हणजे लग्न, कुटुंब, कुटुंबविस्तार, आरोग्य या गोष्टींना दिलेले दुय्यम स्थान. करिअर स्त्रियांनी जरूर करावे, पण त्याच्या किती मागे लागताना लग्नाचे, स्थिरावण्याचे वय फार पुढे चालले आहे, याची जाणीवही असायला हवी. आता अगदी तिशीनंतर मुली लग्नाला तयार होतात. लग्न योग्य वयातच केले तर अपत्यही वेळेत होऊन पुढे वय वाढल्यामुळे येणाऱया समस्यांना सामोरे जावे लागत नाही. तसेच मुलांचे संगोपनही आपण शारीरिकदृष्टय़ा, मानसिकदृष्टय़ा सक्षम असेपर्यंतच आपल्याला चांगले करता येते. आताच्या पिढीला लवकर वेगवेगळ्या शारीरिक समस्या भेडसावू लागल्या आहेत. बऱयाच मुलींना करीअरच्या/स्वातंत्र्याच्या हव्यासापोटी मूलच नको असते. हा विचार करताना समाज, आरोग्य या बाबी दुर्लक्षित करून चालणार नाहीत. मुलांच्या सहवासात घरी आल्यावर दिवसभराचा शीण घालविण्याचे समाधान काय असते हे प्रत्यक्ष अनुभव घेतल्यावरच कळते.
मुलं, कुटुंब आणि करिअर याची सांगड घालताना अनेक तरुण मुलींचा ओढा माहेरी जास्त असतो. हे साहजिक असले तरी दोन्ही कुटुंबांना एकत्र ठेवण्याचा दुवा तीच असते. इथे मुली अधिक स्पष्टवक्त्या असल्या, स्वाभिमान आणि अहंकाराची गल्लत झाली की कौटुंबिक दुरावा निर्माण होतो. आपल्या आईवडिलांप्रमाणेच सासूसासरे असतात व ते तुमच्या मुलांची सांभाळणाऱया मदतनिसांपेक्षा जिवापाड जतन काळजी घेतात, हे लक्षात घ्यावे. कुटुंबात थोडीफार तडजोड अपेक्षित असते आणि यात पती-पत्नी दोघांचाही सहभाग आवश्यक असतो. एका मुलीने सासरी जाताना आईला विचारले की, मी सासरच्या माणसांशी कसे वागू? आईचे अतिशय थोडक्यात सुंदर उत्तर, ‘तुझ्या आईवडिलांशी तुझ्या भावजयीने जसे वागावे असे तुला वाटते तसे वाग.’ हेच संस्कार दोन कुटुंबांना एकत्र ठेवते.
स्त्री-स्वातंत्र्याचा खरा अर्थ जाणून सगळ्याच बाबतीत संतुलन राखले की गोष्टी सहजसोप्या होतात. सध्या याचे भान न राखलयाने कुटुंबसंस्थाच धोक्यात येत आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत. आर्थिक स्वावलंबनाच्या नावाखाली स्वैराचारी वागून लगेच घटस्फोट घ्यायचा. याचा मुलांवर, स्वतःच्या व्यक्तिमत्त्वावर, एकूणच सर्व घरावर काय परिणाम होतो हे गांभीर्याने पाहावे. आज पाश्चिमात्य देशांमध्ये आपल्या भारतीय संस्कृतीबद्दल खूप अभिमानाने पाहिले जाते. बोलले जाते. पण आपण तर त्यांचे अंधानुकरण करीत आहोत. स्त्रियांनी आपल्यावरील अन्याय/अत्याचार अजिबात सहन करू नये हे जेवढे खरे तेवढेच मी आता स्वावलंबी आहे. स्वतंत्र आहे म्हणून तारतम्य न ठेवता वागणे हे स्त्रीच्या उन्नतीचे लक्षण नाही म्हणता येणार. मी शासकीय अध्यापक महाविद्यालयात 37 वर्षे मानसशास्त्राचे अध्यापन केले. माझे आईवडील दोघेही शिक्षक-प्राध्यापक होते. तसेच पती हेदेखील इंग्रजीचे प्राध्यापक होते. अशा सर्व शैक्षणिक वातावरणातून मी आलेली असल्यामुळे स्त्राr ही कुटुंब, पिढी, पर्यायाने समाज हा चांगल्या प्रकारे घडवू शकते यावर माझा विश्वास आहे.



























































