परीक्षण – लोककलावंतांचे दस्तावेजीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>प्रभाकर ओव्हाळ

मराठी लोकसाहित्यात अशी काही पुस्तके असतात की, ती केवळ वरवरच्या वाचनातून कळत नाहीत, तर त्यातल्या प्रत्येक व्यक्तिरेखेशी समरस होऊनच संवाद साधावा लागतो. मगच ती वाचणाऱयाला मंत्रमुख्य करून सोडतात. आपल्या सांस्कृतिक लोककलांच्या जाणिवांचा वेध घ्यायला लावताना प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांचे ‘लोकरंगनायक’ हे असेच वेधक-रेचक पुस्तक ग्रंथालीने नुकतेच प्रकाशित केलेले आहे. त्यात समृद्ध लोकसंस्कृती जतन करणाऱया लोककलावंतांचे जीवन अत्यंत समर्पकपणे रेखाटले आहे.

‘असे म्हणतात की, ज्या गावांत कीर्तन झालं नाही, गोंधळ-भारुड झालं नाही आणि ज्या गावाने तमाशा पाहिला नाही असे महाराष्ट्रातले एक गाव सापडणार नाही?’ ‘लोकरंगनायक’ हा लोक संस्कृतीचा रंजनात्मक आविष्कार होय. या पुस्तकात एकूण 13 दिग्गज व्यक्तिचित्रांची साधना, त्यांच्या कलेचा वारसा, त्यांचे संचित, त्यांनी समृद्ध केलेला भाषिक आशय सामावलेला आहे. यातील अंतरंगात गोंधळ महर्षी राजाराम बापू कदम आहेत. अखंड मराठी मुखांतून शाहिरीचा वसा अजरामर केलेले महाराष्ट्राचे लोकविद्यापीठ पद्मश्री शाहीर साबळे, शाहीर सम्राट बापुराव विभुते, आत्मशाहीर आत्माराम पाटील आहेत. तमाशा कलेतील ‘गाढवाचं लग्न’ फेम दादोबा इंदुरीकर आहेत. दत्तोबा तांबे-शिरोलीकर, विनोदवल्ली काळू-बाळू आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित रघुवीर खेडकर चितारले आहेत. कीर्तनातले ज्ञानदीप ह.भ.प. रामदासबाबा मनसुख, प्रसिद्ध बाहुलेकार परशुराम गंगावणे व लोकेनागर रंगभूमीवरील अवालिया अशोक जी परांजपे आणि देखणा आविष्कार सादरणारे भारुडकार डॉ. रामचंद्र देखणे या दिग्गजांना या ग्रंथात सामावलेले आहे.

डॉ. खांडगे हे ग्रांथीक पंडित नाहीत, तर ते लोककलावंतांचे संघटक आहेत. त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्यात त्यांनी आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग मानला. लोक म्हणजे जनजीवन, रंग म्हणजे लोकसंस्कृतीचे विविध कलाविष्कार आणि नायक म्हणजे उधळणाऱया रंगांना आयुष्यभराच्या कलेने साजिवंत ठेवणारा कलासाधक. त्या अर्थानी ग्रंथात चितारलेली व्यक्तिमत्त्वे एखाद्या कलेचे प्रनिनिधित्व नसून त्या कलेचे प्रतिनिधीक जिवंत विद्यापीठेच आहेत. कारण लोककलांत मानदंड नसतो, कुठलाही ध्येयवाद नसतो. त्यांच्या कलेमध्ये असतो तो अस्खलित जिवंतपणा. महत्त्वाचे म्हणजे अवघे लोककलावंत आनंददायी – प्रबोधनाची कलाच सादर करीत असतात. याचा प्रत्यय डॉ. खांडगे यांच्या पुस्तकातून येतो. भूतकाळातील भाभिनय सम्राट म्हणून लोकप्रिय ठरलेल्या लोककलावंतांना वर्तमानात आणून वर्तमानात उजळवण्याचे वेगळे काम या पुस्तकातून केले आहे. हे वेगळेपण निश्चितच कौतुकास्पद आहे.

डॉ. प्रकाश खांडगे हे क्षेत्रीय संशोधनातच नव्हे, तर ते राज्य-राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सक्रिय आहेत. वेगवेगळ्या राज्यांतून लोककला महोत्सवांतून निष्णात परीक्षक म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. ‘लोकरंगनायक’ त्यांचा दुसरा भाग. याआधी त्यांचा ‘लोकरंगनायिका’ हा पहिला भाग प्रसिद्ध झाला आहे. त्यात देशपातळीवरच्या रंगनायिकांबरोबरच मराठी नायिकांनाही उजळवले आहे. एकूणच क्षेत्रसंशोधनाचे प्रत्यक्षातील अनुभव आणि लोककलावंतांशी झालेल्या संवादाचे संदर्भ यामुळे पुस्तकास अनुभवजन्य खोली प्राप्त झाली आहे. लेखकांनी सादरलेले ‘खंडोबाचं लगीन’ आणि गोंधळ महर्षी राजारामबापू कदम यांनी फ्रान्स देशाच्या आयफेल टॉवरसमोरच्या भव्य प्रांगणात सादरलेले ‘जांभूळ आख्यान!’ वयाच्या शंभराव्या वर्षी ते ज्या नजाकतीची अनुपम राधाविलास गवळण सादर करताना फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रैंकॉइस मितरा यांनी राजारामबापूंना कौतुकाने मारलेली मिठी, ‘मरण माझे-मरून गेले। मज केले अमर’ म्हणत केलेलं वर्णन अवर्णनीय आहे. अशाच इतर लोककलावंतांच्या आठवणी लेखकांच्या झोळीत असल्याने त्यांनी त्या रित्या केल्या आहेत.

हा ग्रंथ केवळ लोककलेतील व्यक्तिचरित्रांचा संग्रह नाही, तर तो महाराष्ट्राच्या लोकपरंपरांचा, लोकजागराचा आणि लोकसंस्कृतीचा अमूल्य सांस्कृतिक दस्ताऐवज ठरतो. लोककला, लोकवाङ्मय ही लोकसाहित्याची अंगे आहेत. लोकसाहित्य हे परंपरेतूनच प्रवाहित होत असले तरी ने नेहमी वर्तमानातच असते, याचा प्रत्यय हा ग्रंथ वाचताना होतो. पुस्तकातले लेख संपले तरीही त्यातील व्यक्तिरेखा वाचकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहतील आणि लोककलांचे अधिष्ठान वाढेल एवढे मात्र निश्चित!

लोकरंगनायक
– प्रा. डॉ. प्रकाश खांडगे
– प्रकाशक : ग्रंथाली प्रकाशन
– मूल्य: 350 रु.