
>> विजय पांढरीपांडे
श्रीलंका म्हटले की, आपल्या मनात जागते ती रामायणाची पार्श्वभूमी. रावणाची लंका, हनुमानाने जाळलेली लंका, सीतेला पळवून अशोकवनात डांबून ठेवले ती लंका, रामाने समुद्र पार करण्यासाठी बांधलेल्या सेतूने हिंदुस्थानशी जोडली गेलेली लंका… हे असे अन् बरेच काही. याव्यतिरिक्त लंकेची आठवण ही त्या देशाच्या पूर्वीच्या ‘सिलोन’ या नावाशी जुळलेली. मुख्यत्वेकडून रेडिओ सिलोनशी. या केंद्रावरून प्रसारित होणारी ‘बिनाका गीतमाला’, तो अमीन सयानीचा मधूर आवाज, सरताज गीताआधी वाजणारा बिगुल. आमच्या शाळा, कॉलेजच्या दिवसांतल्या या सुगम संगीताच्या आठवणीत आमचा भूतकाळ चिंब भिजलेला.
या देशाला ‘पर्ल ऑफ इंडियन ओशन’ म्हणजे रत्नदीप असेही म्हणतात. पाली भाषेतील जुने नाव तम्पपन्नी, नंतर त्याचे सरनदीप झाले. या देशावर डच, इंग्रज, हिंदुस्थानच्या दक्षिणेतील चोला राज्यकर्ते अशी परकीय आक्रमणेदेखील झाली. डचांनी ‘सिलॉन’ अन् नंतर इंग्रजांनी ‘सिलोन’ असं आपापल्या सोयीचं नामांतर केलं. आपल्या देशापाठोपाठ 4 एप्रिल 1948 मध्ये सिलोनलाही स्वातंत्र्य मिळालं, पण तरीही हा देश ब्रिटिशांच्या गव्हर्नन्सखालीच होता. श्रीलंका रिपब्लिक म्हणून घोषित करण्यात आलं ते 22 मे 1972 रोजी. हा त्यांचा खऱ्य़ा अर्थाने स्वातंत्र्य दिन.
श्रीलंकेतील सर्वात मोठे अन् महत्त्वाचे शहर कोलंबो असले तरी ते राजधानीचे शहर नाही. श्रीलंकेची राजधानी आहे श्री जयवर्धनपुरा कोट्टे. या देशात एकूण नऊ प्रॉव्हिन्सेस आहेत. अनेक वर्षे एलटीटीईच्या दहशतवादाने पोळलेला हा देश झपाटय़ाने प्रगती करतोय हे सहज लक्षात येते. हिंदुस्थानच्या तुलनेत हा गरीब देश म्हणता येईल असाच, पण इथली आर्थिक परिस्थिती गेल्या दहा वर्षांत झपाटय़ाने सुधारते आहे. 2009 साली ज्या कोलंबो शहरात एलटीटीईचे रणगाडे घुसले होते त्या शहराची नऊ वर्षांतील आधुनिकतेकडे झुकलेली प्रगती पाहून थक्क व्हायला होतं. इथली लिटरसी रेट 92 टक्के आहे. ‘फास्टेस्ट इकॉनॉमी’ या स्पर्धेत श्रीलंका दहाव्या क्रमांकावर. इथलं चलन मात्र डॉलर्सच्या तुलनेत खालावलेलं. हिंदुस्थानी एक रुपयासाठी श्रीलंकेचे दोन रुपये मोजावे लागतात यावरून विनिमयाची कल्पना यावी.
श्रीलंकेच्या मध्य प्रॉव्हिन्समधील डंबुला येथील लेणी या अतिप्राचीन आहेत. 2000 वर्षांपूर्वीची ही प्रेक्षणीय पाच बुद्ध लेणी अतिविशाल खडकात तळातून कोरलेली आहेत. त्या लेण्यांतील गौतम बुद्धांच्या विविध ध्यानमुद्रा लक्षवेधी, डोळे खिळवून ठेवणाऱ्य़ा अशा आहेत. साधारण 2100 वर्ग मीटर क्षेत्रात पसरलेली महाकाय खडकाच्या तळाशी कोरलेल्या या पाच लेणी युनेस्कोच्या आठ जागतिक हेरिटेज स्थळांत गणल्या गेल्या आहेत. अनुराधापुरा या जुन्या राजधानीच्या शहरातील बुद्धांची स्तूपं, पोलोन्नारुवा, सिगिरिया क्षेत्रातील भग्नावस्थेतील शिल्प, खडकातील कोरीव वास्तू या शेकडो हजारो वर्षांच्या वेगवेगळ्या राजवटीच्या साक्षीदार आहेत. हेवेदावे, एकमेकांवर कुरघोडी, घराण्यातील, नात्यानात्यांतील स्पर्धात्मक द्वेष या इतिहासाला लंकादेखील अपवाद नाहीच.
स्तूपांवरील चौकोनी आकार हा शाश्वत उदात्त सत्याचे प्रतीक. षड्रिपूंवर मात करीत उदात्त मार्गांचा वेध घेत शेवटी निर्वाण, मोक्षापर्यंत, अंतिम लक्ष्यापर्यंत पोहोचण्याची आपली धडपड असते. ही मानवी प्रवासाची शिकवण बुद्धाच्या तत्त्वज्ञानातून प्रतिबिंबित झाली आहे. त्याचेच अलौकिक प्रतिमास्वरूप आपल्याला बुद्धकालीन लेणीतून, शिल्पातून, स्तूपांतून अधोरेखित झालेले बघायला मिळते. अनुराधापुरम येथील बोधिवृक्ष (पीपल ट्री) ही हिंदुस्थानातील बौद्ध गयेतून संघमित्राने आणून लावलेले. आज श्रीलंकेत या बोधिवृक्षाची तिसरी पिढी विस्तारली आहे. जगातील सर्वात जुना मानवरोपित वृक्ष आपल्याला बघायला मिळतो तो येथेच. सिंहगिरी या स्थळालादेखील 1982 मध्ये युनेस्को हेरिटेज साईट म्हणून घोषित करण्यात आले.
श्रीलंकेच्या अनेक वास्तूंवर छाप आहे ती जिओफ्री बावा या आर्किटेक्टची. वयाच्या 83 व्या वर्षी 2003 साली निधन पावलेल्या या स्थापत्य शास्त्रज्ञाने श्रीलंकेत अनेक देखण्या वास्तू निर्माण केल्या. हॉटेल्स बांधलीत. एका दृष्टीनं हा आधुनिक श्रीलंकेचा पाया रचणारा स्थापत्य निर्माता होता असेही म्हणता येईल. श्रीलंकेचे प्रमुख औद्योगिक बाजारपेठेचे उत्पन्नाचे साधन म्हणजे चहा, मसाले अन् रबर. ब्रिटिशांना म्हणा किंवा डच राज्यकर्त्यांना म्हणा, आकर्षण वाटले ते या दोन उत्पादनांचेच. चहाचे अनेक विस्तीर्ण मळे श्रीलंकेत आहेत. एका टी इंडस्ट्रीत जाऊन प्रत्यक्ष चहा निर्मिती प्रक्रिया बघण्याचा योग आला. आपण चवीने पितो त्या एक कप चहामागे किती जणांचे किती कष्ट असतात याची कल्पना आली. अत्यंत कष्टाचे काम करणाऱया या व्यवसायात जास्तीत जास्त महिलाच आहेत. कारण त्यांची मजुरी कमी असते. दिवसाला 20 किलो चहाची कोवळी पाने गोळा करावीच लागतात. या कामाचे त्यांना फक्त 700 ते 800 रुपये मिळतात.
श्रीलंका मसाल्यासाठी तसेच आयुर्वेदिक वनस्पतींसाठी देखील प्रसिद्ध आहे. इथल्या बहुतेक दुर्लभ वनस्पती या युरोप अन् प्रामुख्याने चीनमधून आयात केलेल्या आहेत. आयुर्वेदाच्या एका विस्तीर्ण फार्मची मालकी तर चक्क डॉ. कृष्णमूर्ती रेड्डी या दक्षिण हिंदुस्थानी गृहस्थाची आहे. या आयुर्वेद फार्ममध्ये संजीवनीसह अनेक दुर्लभ वनस्पती आहेत. हे गृहस्थ मधुमेह, वात, अस्थमा, मायग्रेन,त्वचा विकार अशा जवळ जवळ सर्वच रोगांवर औषध निर्मिती करतात. 21 दिवसांत, 45 दिवसांत एकदम बरे करण्याचा दावा करतात. या फार्मला भेट देणारे बहुतेक सर्व त्यांच्या बाटल्यांतील औषध विकत घेतातच. अर्थात त्यातील किती बरे होतात, किती जणांना फायदा होतो हा संशोधनाचा विषय!
राहता राहिला रामायणाच्या संदर्भाचा भाग. एका टेकडीवर चिन्मय मिशनने बांधलेले मारुती मंदिर, अशोक वाटिकेजवळील सीतेचे मंदिर अन् तिथेच शेजारी हनुमानाच्या पावलाचा विस्तीर्ण ठसा एवढय़ाच काय त्या संदर्भखुणा या सात दिवसांत बघायला मिळाल्या. निदान केसरी टुर्सच्या आयोजनात जे दिसले ते एवढेच. एरवी ही टेकडी म्हणजे रामाची फौज, ती टेकडी म्हणजे रावणाची फौज असे गाईड म्हणाला खरा, पण ते अवतीभवतीचे घनदाट जंगल बघता तिथे युद्ध कसे झाले असेल ते कल्पनेला ताण देऊनही उमजत नाही. रावणाने बांधलेल्या शिवलिंगाचा (मनलक मुडेश्वरम्) उल्लेख गाईडने केला खरा. तसेच उसगोंडा येथील सात विहिरींच्या पाण्याच्या रहस्याचादेखील उल्लेख झाला. आईचे श्राद्ध करण्यासाठी, तर्पणासाठी रावणाने या सात विहिरी निर्माण केल्या मंत्रबळाने. या पाण्याच्या उष्णतेतला फरक हा नैसर्गिक चमत्कार. ज्या ठिकाणी हनुमानाने जाळपोळ केली तिथली भूमी अजूनही जळल्यासारखी, जिथे काहीही उपजत नाही. हे असे दंतकथांचे निवडक अपवाद वगळले तर आपण रामायणातून ज्या लंकेचे चित्र अपेक्षितो ते कुठेच दिसत नाही. उदा. रावणाचा राजवाडा, रामसेतू वगैरे. निदान आमच्या कार्यक्रमात तरी ते दिसले नाही हे खरे. रामायणासंदर्भात एक वेगळी स्वतंत्र टूर असते असेही यादरम्यान समजले.
श्रीलंकेत बाजारात व्यापारात अतिक्रमण केलेय ते चीनने. इथल्या लक्झरी बसेस, ट्रेन्स अशा बहुतेक सुविधा चीनकडून आयात केलेल्या. हिंदुस्थानवरचे अवलंबित्व कमीच वाटले. शिवाय आपल्या दक्षिणेकडील राज्यांनी अन् काही प्रमाणात केंद्रानेही प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे एलटीटीईला केलेली मदत हे लोक विसरलेले नाहीत हेही जाणवते. कोलंबो हे शहर आधुनिक श्रीलंकेचा आरसा म्हणायला हरकत नाही. इथल्या इमारती टोलेजंग अन् देखण्या आहेत. इथं अत्याधुनिक हॉटेल्स, मॉल्स आहेत. गंगारामय्या बुद्धिस्ट कॉम्प्लेक्स, टाऊन हॉल, वॉलवेडॉल चर्च, डच हॉस्पिटल, सिनेमन गार्डन, पार्लमेंट एरिया, ट्विन टॉवर्स, पॅरिसच्या कलत्या मनोऱयासारखी झुकलेली भव्य उंच इमारत ही कोलंबो शहराची निवडक वैशिष्टय़े.
श्रीलंकेतील मौसमदेखील लहरीच म्हणायला हवा. ऑक्टोबरमध्येदेखील भयंकर पाऊस. सात दिवसांपैकी दोन दिवस या पावसाचा आम्हालाही त्रास झाला. कारण पर्यटक या नात्याने आपला प्रत्येक क्षण मोलाचा, महत्त्वाचा असतो. त्यामुळे या बिघडलेल्या वातावरणाचा ताप वाटतो. अशा वेळी प्रवासी मित्र, आयोजकांचाही नाइलाज होतो.
n [email protected]
विजय पांढरीपांडे





























































