
उन्हाची काहिली जाणवू लागली की आहार-विहारचा समतोल साधणं कठीण वाटू लागतं. मात्र याच काळात ऋतुचर्या पाळण्याची आवश्यकता असते. आयुर्वेदाच्या दृष्टीने याचा विचार कसा करावा हे पाहूया.
मार्च महिना म्हणजे वसंत आणि ग्रीष्म ऋतू आला आहे. आयुर्वेदोक्त ऋतुचर्या म्हणजे दैनंदिन आहार, विहार याचा शास्त्राrय दृष्टीने विचार हे आपण मागील लेखात पाहिले. या लेखात आयुर्वेदानुसार उन्हाळ्यातील ऋतुचर्या कशी असावी हे पाहूया.
आहार
उन्हाळ्यामध्ये अग्नी मंदावलेला असतो. भूक काहीशी कमी असते. त्यामुळे पचायला जड असलेले अन्न पदार्थ टाळावे. शक्यतो सर्वच प्रकारचा मांसाहार टाळावा. शाकाहारामध्ये कडधान्यांचा वापर कमी करावा. मसूर, कुळीथ, गवार, तोंडली हे अतिशय पित्तकर असल्याने त्यांचा वापर टाळावा. पडवळ, भोपळा, घोसाळी, शिराळी, दुधी, भेंडी, वांगी या भाज्या खाव्यात. तिखट जास्त न वापरता त्याऐवजी ओला कांदा, धणे, जिरे, कोथिंबीर, पुदिना आणि किंचित प्रमाणात मिरे यांचा वापर करावा. ओली अथवा लाल मिरची यांचा वापर शक्यतो टाळावा. ताक, तूप, लोणी यांचा समावेश जेवणात करावा. अति तेलकट पदार्थ शक्यतो टाळावेत.
या काळात भरपूर घाम येत असतो. शरीरातील पाणी कमी होत असल्याने द्रव पदार्थांचा वापर जास्त करावा. पाणी भरपूर प्यावे. या काळात मद्यपान टाळावे . कोल्ड्रिंक्स, बर्फाचे पाणी यांचे अतिसेवन करू नये. त्याऐवजी शहाळे, कोकम सरबताचा जास्त वापर करावा. कोकम सरबत किंवा कैरीच्या पह्यामध्ये वेलची, साखर, सैंधव, मीठ, जिरे घालून प्यावे. त्यामुळे थकवा कमी होतो. काम करण्याची ऊर्जा मिळते.
या काळात लघवीचे त्रास वाढू लागतात. उन्हाळा लागणे, लघवीला आग होणे, लघवीला लाल होणे अशी अनेक लक्षणे दिसून येतात. यावर उत्तम उपाय म्हणजे धान्य पानक. एक ग्लास गरम पाण्यात कुटलेले धणे भिजत घालून त्यामध्ये साखर घालून सेवन केल्याने लघवीच्या तक्रारी दूर होतात. तहान अधिक लागत असेल आणि थकवा येत असेल तर याचा चांगला फायदा होतो.
डाळिंब, काकडी, कलिंगड यांसारखी फळे भरपूर प्रमाणात खावीत. पाणी उकळून प्यावे. फ्रीजपेक्षा मातीचा घडा रांजण किंवा सुरळी यामध्ये पाणी ठेवले असता अतिशय चांगला फायदा होतो. माठामध्ये वाळा किंवा चंदन घालून सुगंधी पाणी प्यावे. वाळामिश्रित पाणी लघवीला साफ होण्यासाठी, लघवीच्या तक्रारी कमी होण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. वाळ्याची मुळे विकत मिळतात. ती स्वच्छ धुऊन त्यांची पातळ पुडी करून सुती कापडांमध्ये पाण्यामध्ये बुडवून ठेवावी. कारण मुळे सुट्टी ठेवल्यास त्यांना गुळगुळीत आवरण पकडून पाणी खराब होण्याची शक्यता असते. प्रत्येक दोन दिवसांआड ही पुरचुंडी सोडून पाण्याने स्वच्छ धुऊन पुन्हा वापरता येते.
या काळात उद्भवणारी समस्या म्हणजे नाकातून होणारा रक्तस्राव. याला सामान्य भाषेत घोणा फुटणे म्हणतात. गाईच्या दुधापासून बनवलेल्या तुपाचे दोन-तीन थेंब नाकात सोडल्यास फायदा होतो. वैद्यकीय सल्ल्यानुसारच करावे.
उन्हाळ्यामध्ये थोडय़ा श्रमानेसुद्धा जास्त प्रमाणात घाम येतो. पर्यायाने थकवा अधिक जाणवतो. म्हणून शक्य झाल्यास अतिशय श्रमाची कामे टाळावी.
या काळात सुती कपडे वापरावेत. काखा, जांघा यांसारख्या जास्त घाम येणारा आणि घाम साठणाऱया जागांवर कपडे परिधान करण्यापूर्वी वाळा, चंदन, कडुनिंब यांसारख्या शीतलता देणारा आणि घामाची दुर्गंधी नष्ट करणारे औषध, चूर्ण यांचा प्रसाधनासाठी वापर करावा. उन्हामध्ये टोपी, गमचा वापरावा. डोळ्यांवर गॉगल वापरावे उन्हातून फिरून आल्यानंतर थोडा वेळ शांत बसून थंड पाण्याचा शिडकावा करावा. गुलाबपाणी वापरल्यास उत्तम.
फक्त याच ऋतूमध्ये दुपारच्या जेवणानंतर काही काळ विश्रांती घेण्याची अनुमती देण्यात आली आहे. थोडा वेळ वामकुक्षी घ्यावी.
या ऋतूमध्ये वैद्यांच्या सल्ल्याने प्रवाहयुक्त गुलकंद, परिपाठादी काढा, त्रिफळा चूर्ण, चंदनादी वटी इत्यादी आयुर्वेदिक औषधांचा वापर केल्यास उन्हाळा सुसह्य होऊ शकतो.



























































