
>> वैश्विक, [email protected]
पृथ्वीवरच्या सर्व संजीवांना जगण्यासाठी प्राणवायू किंवा ऑक्सिजनची किती गरज लागते ते आपल्या स्वतःच्या श्वासावरूनच समजतं. प्राणायाम वगैरे योगक्रिया करताना क्षणकाळ श्वास रोखून धरणं आणि प्राणवायुवाचून घुसमट होणं यात जीवन-मरणाचं अंतर आहे. तेव्हा ‘प्राणवायुविरहीत’ श्वसनावर (!) केव्हा तरी सविस्तर वाचता होईल, पण पृथ्वी वगळून दूर अवकाशात अशा प्रकारे जगणारे ‘कोणी’ सजीव असतील का, असा अनेकदा प्रश्न येतो. त्याचा म्हणजेच सजीव ‘एलियन’चा शोध सुरू आहे.
‘तसे’ कोणी सजीव अजूनपर्यंत सापडलेले नाहीत. मात्र ते नसतीलच असं नाही. ठोस पुराव्याविना खरं विज्ञान ‘हो’ किंवा ‘नाही’ असे निष्कर्ष काढत नाही. ती गोष्ट सतत संशोधनाच्या कक्षेत येते. त्यामुळे अवकाशात ‘प्राणीजगत’ असण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही.
परंतु आकाशदर्शन (तारका पाहताना) अवकाशात अनेक ‘प्राणी’, ‘पक्षी’ आणि ‘माणसांचे’ आकार दिसतात. म्हणजे तसे ते दाखवले जातात. अर्थातच हे आकार केवळ अवकाशातील तारकाच समूह आपल्या लक्षात राहण्यासाठीच काल्पनिक पद्धतीने नोंदलेले असतात हे मुळात लक्षात घ्यायला हवं. चंद्रावरच्या दुरून दिसणाऱ्या विवरांच्या काळसर आकारात ‘ससा’ किंवा ‘हरिण’ पाहणं हा जसा दृष्टिभ्रमाचा प्रकार तसेच हे आकार. असे अनेक आकार आपल्याला सध्या सुरू असलेल्या पावसाळी ढगांमध्येही दिसतात. अगदी कविकुलगुरू कालिदासांच्या ‘मेघदूता’तील ‘आषाढस्य प्रथमदिवसे’ या श्लोकातील प्रचंड मेघांचं वर्णन ‘वप्रक्रीडा परिणत गज’ पिंवा मदोन्मत्त हत्ती असं येतं. अशा कल्पनाविलासातून अनेकदा एखादा विषय रंजकपणे समजतो. म्हणूनच प्राचीन संस्पृतींमध्ये अवकाशातील अनेक तारकासमूहांना पिंवा ‘पॅटर्न’ना प्राण्यांच्या ‘आकारात’ पाहिलं गेलं.
त्याची यादी केली तर दृश्यमान विश्वात सर्वत्र या ‘प्राण्यां’चं अस्तित्व किंवा आकार दिसतील. साधं-सोपं उदाहरण जे आपण नेहमी पाहतो-वाचतो त्या ‘मृग’ नक्षत्राचं. आता दिवाळीनंतर हा तारकासमूह अवकाशात ठळकपणे दिसू लागेल तेव्हा नक्की पहा. खरोखरच एक ‘उडतं’ हरिण आणि त्याला दूरवर असणाऱ्या चमकत्या ‘व्याधा’ने मारलेला ‘बाण’ स्पष्ट दिसेल. यात प्रत्यक्षात तसं काहीच नाही. परस्परांपासून कित्येक प्रकाशवर्षे दूर असलेले आणि एकाच प्रतलातही (समान सपाटीवर) नसलेले हे विविध तारे खूप लांब असल्याने आपल्याला तसा आकार दिसतो इतकंच. त्यातील राजन्य तारा तर ‘द्वैती’ (जोड-बायनरी) आहे आणि बिटेलज्युस (काक्षी) हा लाल महातारा (रेड जायन्ट) असून त्याचा अंत जवळ आल्याचं खगोल संशोधक सांगतात. या ‘हरिणा’च्या ‘शेपटी’मध्ये एक तेजोमेघ (नेब्युला) असून तिथे सुमारे 20 हजार सूर्यांएवढी ऊर्जा दडलेली असून ते ताऱ्यांचं जन्मस्थान म्हणावं लागेल.
एका ‘मृगांची ही ‘गोष्ट’ इथेच संपत नाही. आपण वाचतोय काल्पनिक आकाराविषयी. ढगांमधला एकच भाग जसा अनेकांना विविध आकारात, ज्याच्या त्याच्या कल्पनाशक्तीनुसार दिसतो तसाच हा प्रकार आहे. आपण ज्याला ‘मृग’ आणि ‘व्याध’ म्हणतो त्याला प्राचीन ग्रीकांनी ‘ओरायन’ या शिकाऱ्याच्या स्वरूपात पाहिलं. लोकमान्य टिळक यांनी खगोलशास्त्राचा अभ्यास तत्कालीन उपलब्ध संदर्भानुसार करताना त्यांच्या इंग्लिश ग्रंथाला ‘ओरायन’ असंच नाव दिलंय. त्यावरून प्राचीन कालक्रमाचा शोध घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. अशी पुस्तकं आजच्या संदर्भात किती अचूक याची चर्चा करताना तत्कालीन काळात ‘जाऊन’ त्याकडे पाहावं लागतं. ‘टॉलेमी’ यांचा पृथ्वीकेंद्रित पिंवा कोपर्निकस यांचा ‘सूर्यकेंद्रित’ विश्वाचा सिद्धांत आधुनिक अभ्यासातील निष्कर्षानंतर चुकीचा ठरतो आणि तरीही त्यांच्या ‘संशोधन वृत्तीचं’ महत्त्व कमी होत नाही. तसंच अशा प्राचीन लिखाणांविषयी असू शकतं. विज्ञान अभिनिवेशावर नव्हे तर केवळ आणि केवळ संशोधनावर आधारित असतं. म्हणूनच ग्रीकांनी आपल्या ‘मृग’ नक्षत्राच्या आकारात पूर्ण शिकारी ‘बसवला’ आणि आपण ज्याला व्याध म्हणजे शिकारी समजतो तो त्यांच्या कथेत शिकारी श्वानाचा (पॅनिस मेजरचा) एक भाग ठरतो.
इथे ‘व्याध’ हा आपल्याला आकाशदर्शन करताना दिसणारा, रात्रीच्या आकाशातील सर्वात दृश्य ठळक तारा आहे हेसुद्धा लक्षात असू द्या. इतर ताऱ्यांच्या तेजस्वितेची ‘प्रत’ ठरवताना व्याधाची ‘प्रत’ 1 मानली जाते. त्यामध्ये उणे प्रतीचे तेजस्वी आणि अधिक प्रतीचे फिकट तारे असे वर्गीकरण केलं जातं. आकाशातील इतर प्राणी पुढील एका लेखात.