‘मानसमित्र’ – समुपदेशनाद्वारे मानसिक स्वास्थ्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> ममता क्षेमकल्याणी

प्रयास बहुउद्देशीय विकास संस्था आणि ताराचंद रामनाथ सेवा ट्रस्ट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मानसमित्र’ ही मानसिक स्वास्थ्य चांगलं राहावं यासाठी समुपदेशन करणारी हेल्पलाईन चालवली जाते. कोविड 19च्या पार्श्वभूमीवर विविध पातळय़ांवर मानसिक झगडा देत असलेल्या व्यक्तींचे विनामूल्य समुपदेशन करणारी ही हेल्पलाइन समाजाला निश्चितच उभारी देणारी आहे.

संपूर्ण जगाला विळखा घातलेल्या कोविड19ने केवळ शारीरिक नव्हे तर जगाच्या सामाजिक, आर्थिक आणि मुख्य म्हणजे मानसिक आरोग्यावर खूप आघात केले आहेत. कल्पनेपलीकडच्या या विषाणूने नैराश्य, उदासीनता, भीती, संशय, न्यूनगंड, एकलकोंडेपणा, हिंसा अशा कितीतरी मानसिक समस्यांनी बालकांपासून ज्येष्ठांपर्यंत अनेकांना ग्रस्त केले आहे. या सर्व मानसिक समस्या विविध मार्गांनी व्यक्त होत असल्याचा प्रत्यय आपल्याला दैनंदिन जीवनात येतो आहे. अशा परिस्थितीत समाजाचे बिघडलेले मानसिक आरोग्य समुपदेशनाच्या प्रभावी उपचारांनी सुरळीत करण्यासाठी प्रयास बहुउद्देशीय विकास संस्था आणि ताराचंद रामनाथ सेवा ट्रस्ट, पुणे या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘मानसमित्र’ ही हेल्पलाइन नुकतीच सुरू करण्यात आली आहे. सध्याच्या एकूणच सामाजिक आणि आर्थिक अस्थिरतेमुळे मानसिक आरोग्य ढासळत चालले आहे.

शिवाय गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या साथीमुळे त्यात अधिकच भर पडली आहे. अशा परिस्थितीत मानसिक आरोग्य सेवा घेणे हे गोरगरीबांना तसेच सर्वसामान्यांच्या खिशाला परवडण्यासारखे नाही. या पार्श्वभूमीवर ही मानसमित्र विनामूल्य समुपदेशन हेल्पलाइनची सेवा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सध्याची एकूणच सामाजिक परिस्थिती, कोरोनाचे संकट, मानसिक ताण, नैराश्य, रोजच्या धकाधकीच्या जीवनात भेडसावणारे प्रश्न, किशोरवयीन आणि युवकांमध्ये वाढणारी व्यसनाधीनता या आणि अशा अनेक मानसिक समस्यांचे व्यवस्थापन करण्याची आव्हाने आज समाजासमोर आहेत. त्या आव्हानांचा सामना करताना सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी प्रयास बहुउद्देशीय विकास संस्था आणि ताराचंद रामनाथ सेवा ट्रस्ट, पुणे यांनी पुढाकार घेऊन ‘मानसमित्र’ ही विनामूल्य समुपदेशन हेल्पलाइन सेवा विकसित केली आहे. ही विनामूल्य समुपदेशन सेवा 022-41494949 या हेल्पलाइन क्रमांकावर उपलब्ध आहे.

आठवडय़ातले सातही दिवस सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत या हेल्पलाइनद्वारे लाभार्थींचे समुपदेशन केले जात आहे. मुख्य म्हणजे ही हेल्पलाइन पूर्णपणे मोफत असून त्यासाठी लाभार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. याचबरोबर लाभार्थ्यांना विशेष उपचारांची गरज भासल्यास त्यांची समस्या सोडविण्यासाठी ज्येष्ठ मानसोपचार तज्ञ, सेवाभावी संस्था किंवा मनोविकार तज्ञ यांचे मार्गदर्शन हवे असल्यास त्यांची माहितीदेखील लाभार्थ्यांना दिली जाते. त्यामुळे त्यांना पुढील समुपदेशन आणि उपचार घेण्यास मदत होते. लाभार्थ्यांशी मनमोकळेपणाने संवाद साधून मानसिक आरोग्याविषयी त्यांचे योग्य ते प्राथमिक समुपदेशन करणे, त्यांना मार्गदर्शन करणे आणि त्यांच्या मनातील नैराश्याचे मळभ दूर करणे ही या हेल्पलाइनची तीन प्रमुख उद्दिष्टे आहेत.

ही हेल्पलाइन सिंगल नंबर प्रणालीवर आधारित असून हेल्पलाइनसाठी दिलेल्या नंबरवर डायल केल्यानंतर मानसिक अस्वास्थ्यावर मार्गदर्शन आणि समुपदेशन मिळते. हेल्पलाइनच्या सुरुवातीच्या काळात लाभार्थ्यांच्या मातृभाषेत, मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये समुपदेशन केले जात आहे. कालांतराने इंग्रजी भाषेचासुद्धा समावेश करण्यात येईल. तसेच पुढील काळात हीच हेल्पलाइन 24 तास उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लाभार्थ्यांकडून मिळालेली सर्व माहिती, त्यांनी त्यांच्या मानसिक ताणाविषयी साधलेला संवाद आणि त्यांची समस्या या सर्व बाबींची गोपनीयता राखली जाते.

या हेल्पलाइनद्वारे मुख्यतः चार विषयांवर आधारित समस्यांवर मदत मिळते आहे. त्यामध्ये कोरोना आणि त्याच्याशी निगडित ताणतणाव तसेच मानसिक अस्वास्थ्य, नैराश्य, भीती, काळजी, चिंता, उदासीनता इत्यादीबाबत समुपदेशन करून मानसिक आधार दिला जातो. वयोवृद्ध व्यक्तींना मानसिक आधार देऊन त्यांचे समुपदेशन केले जाते. कोरोना काळात दोन्ही किंवा एक पालक गमावलेल्या लहान मुलांना किंवा त्यांच्या एकल पालकांना, जे डीसीटी (थेट रोख खात्यात जमा) प्रकल्पात सहभागी असतील, अशा मुलांचे आणि पालकांचे मानसिक आधार देऊन समुपदेशन केले जाते, तसेच संयम व्यसन प्रतिबंध प्रकल्पात सहभागी किशोरवयीन मुलांना व्यसन प्रतिबंध समुपदेशन करण्याचे काम या हेल्पलाइनद्वारे केले जात आहे.

किशोरवयीन मुलांमध्ये वाढती व्यसनाधीनता ही आजच्या पालकांसमोरील एक गंभीर समस्या आहे. तंबाखू, सिगारेट, मद्यपान, ड्रग्ज याबरोबरच मोबाईल आणि समाजमाध्यमे या व्यसनांचा विळखा किशोरवयीन मुलांचे जीवन उद्ध्वस्त करतो आहे. अशा परिस्थितीत किशोरवयीन मुलांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक समुपदेशन तसेच व्यसनी मुलांचे उपचारात्मक समुपदेशन करण्यात ही विनामूल्य हेल्पलाइन मोलाची भूमिका बजावत आहे. या चार विषयांशी संबंधित तज्ञ समुपदेशक या हेल्पलाइनच्या माध्यमातून लाभार्थ्याशी संवाद साधतात.

मानसमित्र विनामूल्य समुपदेशन हेल्पलाइनविषयी प्रयास बहुउद्देशीय विकास संस्थेचे संस्थापक विश्वस्त राजेश अलोणे यांनी सांगितले की, मानसिक आरोग्याबाबत संपूर्ण समाजात मोठय़ा प्रमाणात अनास्था दिसून येते. आपल्या किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीच्या मानसिक समस्यांची जाणीव होणे हेदेखील एक मोठे आव्हान असते. त्याहीपुढे जाऊन या मानसिक समस्येचा स्वीकार, त्यावर चर्चा, समुपदेशन आणि उपचार अशा अनेक पायऱया आहेत. अनेकदा लोकांना आपल्या मानसिक समस्यांविषयी थेट मानसोपचार तज्ञ किंवा प्रत्यक्ष समुपदेशकाकडे जाण्यास संकोच वाटतो. शिवाय आर्थिक अडचणींमुळे त्यांचे शुल्क परवडतदेखील नाही. अशा परिस्थितीत मानसिक समस्यांकडे दुर्लक्ष केले जाते. ‘मानसमित्र’ ही विनामूल्य समुपदेशन हेल्पलाइन सेवा अशा सर्व स्तरांतील व्यक्तींसाठी सहाय्यभूत ठरणार आहे. माझ्या अनुभवानुसार ग्रामीण, निरक्षर किंवा निम्न आर्थिक स्तरातील व्यक्ती या शहरी, सुशिक्षित किंवा आर्थिक सुस्थित असलेल्या व्यक्तींपेक्षा मानसिक समस्यांबाबत अधिक जागरूक आणि स्वीकारार्ह असतात. आपली समस्या अंगारे-धुपारे किंवा कोणतेही गंडेदोरे बांधून सुटणार नाही हे लक्षात आल्यावर ते समुपदेशक किंवा मानसोपचार तज्ञांवर श्रद्धा ठेवून त्यांच्या सूचनेनुसार अनेक बाबतीत बदल करतात. या घटकासाठी ‘मानसमित्र’ ही विनामूल्य समुपदेशन हेल्पलाइन खऱया अर्थाने वरदान ठरणार आहे. लोकांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल तर त्याचा समाजाला आणि पर्यायाने देशाला फायदा होत असतो. यासाठी प्रयास बहुउद्देशीय विकास संस्था आणि ताराचंद रामनाथ सेवा ट्रस्ट, पुणे यांनी उचललेले हे पाऊल म्हणजे सध्याच्या परिस्थितीत मिळणारी उभारी आहे. या हेल्पलाइनच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात विनामूल्य समुपदेशन सेवा उपलब्ध करून दिली जात आहेत. त्यासाठी संपूर्ण राज्यातील 22 जिह्यांचे समुपदेशक प्रतिनिधी, 63 स्वयंसेवक समुपदेशक आणि मानसतज्ञ समुपदेशनासह मानसिक आरोग्य जनजागृती प्रबोधन करत आहेत.

या हेल्पलाइनसाठी लागणारे सर्व आर्थिक सहाय्य करण्याची जबाबदारी ताराचंद रामनाथ सेवा ट्रस्ट, पुणे या संस्थेने घेतली आहे, तर लाभार्थ्यांचे समुपदेशन करून त्यांना मार्गदर्शन करणारे सर्व समुपदेशक हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात अनुभवी असून ते स्वयंसेवी पद्धतीने हे काम करत आहेत. सध्याच्या स्पर्धेच्या युगात सर्वांनाच तणावाचा सामना करावा लागतो. लहान मुले, तरुण, पुरुष, महिला तसेच वृद्धांनादेखील तणावाला सामारे जावे लागते. बदलत्या जीवनशैलीमुळे आपण स्वतःच अनेक मानसिक समस्यांना आमंत्रण देत आहोत. या पार्श्वभूमीवर ‘प्राथमिक मानसोपचारांना प्राधान्य देऊ, मानसिक स्वास्थ्य सुदृढ ठेवू’ अशी भूमिका घेऊन सुरू झालेली ही हेल्पलाइन व्यक्ती आणि समाजाला योग्य दिशा दाखविण्याचे काम करीत आहे.

[email protected]