निर्जला एकादशी!

ravindra-gadgil>>रवींद्र वासुदेव गाङगीळ.

हिंदुस्थानी सणवार, व्रतवैकल्ये, धार्मिक यमनियम हे अत्यंत काटेकोरपणे सखोल अभ्यास करून आखलेले व सोबत येथील उपलब्ध अनुकूल, प्रतिकूल निसर्ग, पर्यावरण, आरोग्य, स्वच्छता अशा व अनेक गोष्टींचा सारासार विचार करून त्यांची यशस्वी सांगड घातली आहे. आता पुढे चातुर्मास सुरू होईल. त्याचा शुभारंभ या येत्या आषाढी शुद्ध एकादशीपासून सुरू होऊन कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत समाप्ती होईल. पावसाळ्याच्या दृष्टीने शरीरधर्म निरोगी ठेवण्यास याचा उपयोग होतो. कारण पचनशक्ती मंदावते आणि अनेक पावसाळी आजार मागे लागतात. म्हणून कमी आहार, एकभुक्त, उपवास याची ह्या महिन्यांमध्ये सक्ती असते किंवा तशी व्रते आखून जिभेवर व पोटावर नियंत्रण येते. पूजापाठ सोडल्यास विवाहादी कार्ये निषिद्ध ठरवली गेली आहेत. कारण हवामान तसे अनुकूल नसते. नदीला पूर, वादळ, धो धो पाऊस, आजार यामुळे प्रवास धोक्याचा व जोखमीचा होत असे. आता आधुनिक तंत्रामुळे प्रवास सुखरूप झाला असला तरी धोका टळलेला नाही, हे आपण नित्य येणार्‍या बातम्यांवरून अंदाज बांधू शकतो.

पण हे आताच्या पिढीला पटणे जरा कठीणच, त्यामुळे घरातले कितीही समजावत असेले तरी त्याला एक आध्यात्मिक, धार्मिक अवगुंठण करून संगितले की आताचीही पिढी पटवून घेते. मूळ हेतु सध्या होण्यासाठी मग, पोथ्या, पुराणे, ग्रंथ, पारायण, पुजा याद्वारे लोकांच्या मनावर बिंबवले गेले. काय खावे काय खाऊ नये ह्याचेही वेळापत्रक आरोग्याच्या दृष्टीने मांडलेले आढळेल.

प्रत्येक महिन्याच्या शुद्ध व कृष्ण एकादशीला नावाने ओळखले जाते. तसेच या ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल एकादशीला निर्जला एकादशी असे नाव आहे. पाण्याचा एक थेंबही न घेता हे व्रत केले जाते. हे  बहुधा जून महिन्यात येते. उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष असतेच. पण जून मध्ये ते नसावे पण असते कारण मृगाचा पाऊस, वळवाचा पाऊस आला की तो अशी दडी मारून बसतो की बस. शेतकरी आभाळाला डोळे लावून बसलेला असतो, कारण त्याला वेळेवरच पेरणी करायची असते, म्हणून तो पावसाची चातकासारखी वाट बघत असतो. उष्माघाताने जमीन तप्त झालेली असते ती सुद्धा पाण्याची वाट बघत असते. आणि आपणही धड उन्हाळा नाही आणि धड पावसाळा नाही अशा अवस्थेत अस्वस्थ. तेव्हा कुठे आपल्याला जाणीव होते की पाणी हे ‘जीवन’ आहे. ज्यासाठी खेडोपाडी लोक मैलोनमैल भटकत असतात, अन ते मिळतच असेही नाही. अगदी प्राण कंठाशी येतो. पृथ्वीवरचे पाणी संपत चालले आहे असे म्हणतात. आणि असेही भविष्य वर्तवले जात आहे की ‘तिसरे महायुद्ध’ हे पाण्यावरून होणार आहे. इतके पाण्याचे महत्व! आपल्याला कळत असते पण वळत नाही, कारण आपण पाणी साठवतच नाही. निदान त्याचा वापर तरी काळजीपूर्वक करायला हवा, हेही आपल्या लक्षात येत नाही आहे. ह्या दिवशी मात्र आपल्याला हटकून पाण्याची आठवण येते, अशी ही निर्जळा एकादशी.

ही अशी पाणी न पिता एकादशी करण्यामागे एक कथानक आहे. पांडवांपैकी भीम हा महाबलिष्ठ असल्याने त्याचा आहार राक्षसी होता व त्याची भुकही प्रचंड. त्याने आपल्या भावंडांना नेहमी विविध व्रते उपास तापास पूजापाठ करताना बघितले, पण आपल्याला ते करता येत नाही, कारण भुकेवर नियंत्रण नाही, ह्याचे त्याला वैषम्य वाटे. करायचे तर आहे पण करू शकत नाही अशा अनेक गोष्टी आपल्या जीवनात येत असतात व त्याचे शल्य आपण उराशी बाळगून असतो. तसेच भीमाचे झाले. यावर एखादा पर्याय (शॉर्टकट आपण तो नेहमीच शोधत असतो) आहे का असे त्याने महर्षि व्यासांना एकदा विचारले. हा रोजरोज उपासतापास न करता थोड्या प्रयत्नाने भरपूर पुण्यप्राप्ती होईल असा सोप्पा मार्ग सांगा. कारण हे उपास माझ्यासारख्याला झेपणारे नाहीत. तेंव्हा त्यांनी ‘निर्जळा एकादशीचे’ व्रत करायला सांगितले. ही एकादशी केल्यावर बाकीच्या २३ एकादशा करण्याची गरज राहणार नाही. पण एखाददिवशी तरी या इंद्रियांना आराम पडून त्यांना संयमाचे महत्त्व जाणून घेतले पाहिजे, कारण रोजच सर्वकाही मिळेल याची शाश्वती नसते. एखादा दिवस असा येतो की काहीच मिळत नाही, तेव्हा हा संयम कामास येतो. हे भीमास पटले आणि त्याने तो उपवास केला. म्हणून या एकादशीला ‘भीमसेनी एकादशी’ असेही म्हणतात. जर तो भीमकाय माणूस हे करू शकतो तर आपण सर्वसाधारण माणूस का करू शकत नाही.

इतका आपला धर्म हा सहिष्णू (फ्लेक्झिबल-अनेक पर्याय असलेला,सक्ती नसलेला) आहे. धर्माचार्यांनी अनेक जवळचे मार्ग आखून ठेवले आहेत. कारण धर्माने मानवाची सोय पाहिली पाहिजेच. ज्याला जे आणि जेवढे झेपेल ते आणि तेवढे त्याने मनापासून करावे असा त्यामागील दृष्टिकोन आहे.

मग काय करणार ना ‘निर्जला एकादशी’?