
>>मिलिंद मराठे
महाराष्ट्राच्या साहित्य-संस्कृती विश्वाला अधिक झळाळून टाकणारा पुणे पुस्तक महोत्सव यंदाही तितकाच विश्वविक्रमी ठरला आहे. `वाचन संस्कृती’ या संज्ञेची व्याप्ती वाढवणारा हा महोत्सव विचारांचा आणि आनंदाचा उत्सव ठरला आहे.
राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) पुणे पुस्तक महोत्सवाचे हे तिसरे वर्ष. तिसर्याच वर्षी इतका नावलौकिक मिळवणारा हा एकमेव साहित्य महोत्सव ठरावा इतके याचे व्यापक स्वरूप झाले आहे. हे पाहता हा केवळ उत्सव नसून वाचन संस्कृती जोपासली जावी यासाठी सुरू केलेली ही एक चळवळ आहे असेच म्हणायला हवे. आज पुणे पुस्तक महोत्सवाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसापर्यंत उत्सवाला मिळालेला प्रतिसाद पाहता हा पुस्तक महोत्सव वेगळ्या उंचीवर गेला आहे. आतापर्यंतच्या पुणे पुस्तक महोत्सवात सर्वाधिक विश्वपाम झाले आहेत, हे अद्भुत आहे.
पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाला केवळ पुणेकरच नाही तर महाराष्ट्रातील पुस्तकप्रेमींनी अलोट गर्दी केली. वाचन केवळ छंद नाही, तर जीवनशैली आहे, हे पुणे पुस्तक महोत्सवाच्या यशातून सिद्ध झाले आहे. तब्बल 800 बुक स्टॉल आणि 50 लाख पुस्तकं एकाच छताखाली पाहताना खरा वाचनप्रेमी या शब्दोत्सवाच्या प्रेमात न पडता तरच नवल. याही महोत्सवात साहित्यप्रेमींचे हे प्रेम दिसून आले. मराठी, हिंदू, इंग्रजी, तमिळ, तेलगू यासारख्या विविध भाषांमधील पुस्तकं महोत्सवात पाहायला मिळत आहेत. अभिजात मायमराठीवर रसिकांचे पुत्रवत प्रेम दिसून येत आहे. हेच या सोहळ्याचे साध्य असे म्हणावे लागेल.
नऊ दिवस सुरू असणाऱ्या या महोत्सवात साहित्य-संस्कृतीतील प्रयोगशीलता राखण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम, उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पुस्तक प्रदर्शनासोबतच बाल महोत्सव, मिलेट महोत्सव, छायाचित्रांचे प्रदर्शन यासारख्या उपामांनाही चांगला प्रतिसाद लाभला. अंतराळवीर शुभांशू शुक्ला, लेखिका बानू मुश्ताक, शरणकुमार लिंबाळे, प्रविण दीक्षित, एम. जे. अकबर, अक्षत गुप्ता, आचार्य प्रशांत, बी. एस. नागेश, वसंत शिंदे, असे विविध मान्यवर यांचे व्याख्यान रसिकांसाठी महत्त्वाचे आकर्षण ठरले. एका छताखाली हजारोंच्या संख्येने उपलब्ध होणारी पुस्तकं आणि त्यातून वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी हा या महोत्सवाचा उद्देश आहे. या महोत्सवात `पुणे लिट फेस्ट’चे आयोजनही करण्यात आले. यात साहित्यिक, वैचारिक, शैक्षणिक कार्पामाचे आयोजन करण्यात आलं आहे. मराठी, हिंदी व इंग्रजी अशा तीन भाषांमधून 40 पेक्षा अधिक प्रज्ञावंतांचे विचार ऐकण्यासोबतच, त्यांच्याशी संवादही साधता आला. प्रशासन, उद्योग, संशोधन, समाजकारण आदी क्षेत्रांमधील नामवंत व्यक्तींच्या साहित्याचे विश्लेषण रसिकांना भावले. वाचन संस्कृतीसोबतच खाद्यसंस्कृती जोपासणारे 100 पेक्षा जास्त फूड स्टॉल हा देखील तृप्त करणारा अनुभव आहे.
महोत्सवाला भेट देणार्या एक लाख विद्यार्थ्यांना बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचे `आनंदमठ’ हे पुस्तक भेट म्हणून देण्यात आले. अनेक शाळांना महोत्सवात सहभागी करून घेण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांना पुस्तक कूपन देण्यात आले. सर्व भारतीय भाषांमधील साहित्यसंपदा एकाच छताखाली उपलब्ध झाल्याने वाचनप्रिय रसिकांची पावले पुस्तक महोत्सवाकडे वळली. महोत्सवातील दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांनी रसिकांची विशेष दाद मिळवली. पुणे लिट-फेस्ट सारख्या विचारप्रवर्तक साहित्य संस्कृतीच्या उत्सवातून ज्ञानाची गंगा अवतरली. पुस्तक महोत्सवात आत्तापर्यंत13 गिनीज विश्व पाम साकारले गेले. यावर्षी `शांतता पुणेकर वाचत आहेत’ व आदिवासी शब्द असलेल्या 1,678 पोस्टर्सचे प्रदर्शन या उपक्रमांनी विश्वपाम नोंदवला. स्वयंसेवक, युवक संघटना आणि सामान्य नागरिक यांच्या एकत्रित प्रयत्नांतून साकारलेले हे विक्रम म्हणजे राष्ट्रभक्ती, संघभावना आणि सकारात्मक सहभागाची चेतना आहेत.
पुस्तकप्रेमींनी दिलेला दणदणीत प्रतिसाद या शब्दात बरंच काही सामावले आहे. नऊ दिवसांच्या या महोत्सवाला लाखोंच्या संख्येत साहित्यरसिकांनी दिलेली भेट, पुस्तक वाचन संस्कृती हरवली आहे हा कयास मोडून काढणारा कोटींचा आकडा ओलांडणारा ग्रंथ व्यवहार, वाचन व साहित्य संस्कृतीला चालना देणारे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, अगणित पुस्तक प्रकाशन सोहळे, 80 हून अधिक प्रकाशन संस्थांचा सहभाग हे सारं महाराष्ट्राच्या साहित्य-संस्कृती विश्वाला अधिक झळाळून टाकणारे आहे. उपक्रम, भाषा आणि प्रांत हे सारे उंबरे ओलांडणार्या पुणे पुस्तक महोत्सवाने `वाचन संस्कृती’ या संज्ञेची व्याप्ती अधिक वाढवली आहे.
(लेखक राष्ट्रीय पुस्तक न्यास (एनबीट्री) चे अध्यक्ष आहेत.)
शब्दांकन : शुभांगी बागडे


























































