
>>संध्या शहापूरे<<
भगवंतांनी आपल्या भक्तांचे कल्याण साधल्याचे अनेक दाखले पुराणकथांतून आपल्याला उमजतात. भक्तीचे महात्म्य असे आहे की, मानवाच्या सर्व भावांचे अंतिम ध्येय परमेश्वरच आहे. पतीत असो व दुराचारी असो, तो सुद्धा भक्तीमुळे साधू होऊ शकतो. निस्सीम भक्तीने नाहिसे होणार नाही, असे पाप या जगात नाही. ईश्वराच्या भक्तीत जातीकुळीलाही महत्त्व नाही. ईश्वरस्वरूपी होऊन जो ईश्वराला भजतो, असा भक्त ज्ञानेश्वरांच्या मते मूर्तिमंत ज्ञानच होय. सर्व चराचरात भक्ताला ईश्वराशिवाय दुसरे दर्शन होत नाही तो खरा भक्त! ‘जे जे भेटे भूत, तेथे मानिजो भगवंत, हा भक्तियोग निश्चित, जाण माझा।’ (ज्ञानेश्वरी अध्याय दहावा ओ. 128) भक्तीचा मार्ग आचरून जो संत होतो, भक्त होतो, त्याच्यावर लोकोद्धाराची- लोककल्याणाची जबाबदारी आपोआपच येते. भगवंत म्हणतात माझे स्थान कुठे आहे? ‘जेथ जेथ संपत्ती आणि दया, दोन्ही वसती आलिया, असती ठाया, ते ते जाण धनंजया, विभूती माझी।’ (अध्याय दहावा ओ.360) संत तुकारामांनी म्हटले आहे, का रंजले गांजले। त्यासी म्हणे जो आपले। तोचि साधू ओळखावा। देव तेथेची जाणावा।’ समर्थ रामदास, अशी भक्ती करणाऱ्या भक्तांना वारंवार आश्वासित करतात की, ‘नुपेक्षी कदा रामदासाभिमानी’
उपेक्षा कधी रामरूपी असेना।
जिवा मानवा निश्चय तो वसेना।
शिरी भार वाहेन बोले पुराणी।
नुपेक्षी कदा रामदासाभिमानी।।
























































