…दोघी हव्याशा!

810

. वि. 1800 ते 2018. स्त्रीच्या शिक्षणाचा… अस्तित्वाचा… स्वत्त्वाचा… संघर्षाचा खूप मोठा पल्ला आपण साऱ्याजणींनीच पार केलाय. काट्याकुट्यांनी भरलेली… अलवणातली बिकट, अंधारली वाट पार करून कणखरपणे उभ्या आहोत अंतरंगातील तेजाने तळपत…पण… तरीही अजूनही मुलीला अस्तित्वासाठीच संघर्ष करावा लागतो आहे. परवाच आलेली बातमी… पहिल्या मुलीच्या पाठीवर दुसरी मुलगीच झाली म्हणून आईने नवजात मुलीला नख लावलं… काय हा विरोधाभास… म्हणजे ही लढाई अजूनही संपलेली नाही…ज्या आईच्या दोन्ही मुलीच आहेत आणि हव्याशा आहेत… अशा आयांची मनोगते…

माझ्या मुली माझा अभिमान

अर्भकाची हत्या ही खूपच घृणास्पद गोष्ट आहे. तेही फक्त दुसरी मुलगी झाली म्हणून? आज अशीही कुटुंब आहेत जी मुलीच्या प्रतिक्षेत असतात आणि मुलगी झाल्यावर आनंदोत्सव साजरा करतात. मुली झाल्यावर हत्या करणारे माता पिता विकृतच. मलाही दोन मुली आहेत. पण त्याचा मला आज अभिमानच आहे. सगळ्याच बाबतीत माझ्यासोबत त्या ढालीसारख्या असतात. घरच्यांच्या अपेक्षा होत्या दुसरा मुलगा व्हायला हवा म्हणून, पण आम्हा पतीपत्नीला दुसरी मुलगी झाल्याचा आनंदच झाला. आज मुलं जे करु शकत नाहीत त्याच्या दुप्पट मुली करतात. त्या चांगल्या पद्धतीने स्वतःची काळजी घेतात, अभ्यास करतात आणि आईला मदत करतात. त्यामुळे दुसरी मुलगी झाली म्हणून तिचा तिरस्कार न करता तिलाही आपलंसं करा. तिचे पालनपोषण असे करा की उद्या तुम्हाला तिचा अभिमान वाटेल.

मुग्धा मौजे, बेलापूर

माझा विश्वास माझे सामर्थ्य

सरकारकडून लेक वाचवा, लेक शिकवा असा जागर होत असताना अशा प्रकारच्या घटना होतात हे धक्कादायक आहे. मुळात आपल्या पोटच्या मुलीची हत्या करायला त्या आईवडिलांचं काळीजच कसं धजावलं? आईवडील कसे काय एवढे निर्दयी होऊ शकतात. आज माझ्या दोन मुली आहेत. मला आनंद आहे. घरात त्यांचा चिवचिवाट सुरु असतो. दंगा, मस्ती सुरु असते. माझ्या चिमुरड्या… मी आजारी पडल्यावर त्या एवढ्याशा असूनही माझी काळजी घेतात. आई-बाबांना छोट्या-छोट्या गोष्टीत मदत करतात. त्यांच्या असण्यामुळेच माझ्या जगण्याला अर्थ आहे. आज त्यांच्याकडून मी अनेक गोष्टी शिकतेय. खरंच मला वाटतं प्रत्येकाला मुलगी असावी. माझ्या मुली माझा विश्वास माझे सामर्थ्य आहेत. दुसरी मुलगी झाली म्हणून तिचा राग करु नका. तिला आपलीशी करुन बघा, उद्याचे तुमचे उज्वल भविष्य असेल.

प्रिती पिंपळकर, अंधेरी

मुलगी माझं जीवनच

पुन्हा मुलगी झाली म्हणून तिला नाहीशी करण्याचा विचार माझ्या मनात तेव्हाही नव्हता आणि कधी येईल असं वाटत नाही. कारण  ज्या पद्धतीने त्या बाळाला शिकवतो, त्याच्यावर संस्कार करतो त्यानुसारच तो घडतो. मला पहिली मुलगीच. दुसऱ्यांदा जेव्हा बाळंतपण आलं तेव्हा डॉक्टरांना आम्ही सांगितलं यापुढे आम्हाला बाळ नको. तेव्हा डॉक्टरांनी विचारलं, पहिली मुलगीच आहे ना, मुलासाठी तुम्ही विचार करणार नाही का? त्यावेळी आम्ही स्पष्ट सांगितलं, दुसरी मुलगी झाली तरी आम्हाला ती मुलासारखीच प्रिय असेल. झालंही तसंच… आम्हाला दुसरी मुलगीच झाली. मेघना… पण तेव्हापासून आतापर्यंत आम्हाला मुलगा नसल्याची खंत कधी वाटली नाही. आणखी एक सांगायचं म्हणजे, मेघना आता कॉलेजला जाते. पण कॉलेजातून आल्यावर ती घरातच असते. त्यामुळे घर कसं भरलेलं वाटतं. मुलगा असता तर या वयात तो मित्रांसोबत बाहेरच असता. आम्हाला त्याचा सहवास फार कमी मिळाला असता. म्हणून दुसरीही मुलगीच झाली याचा आम्हाला केवळ आनंदच नाही, तर सार्थ अभिमानच आहे. तीच माझं जीवन आहे.

अनघा फणसे, उल्हासनगर

आपली प्रतिक्रिया द्या