>> सुरभी हांडे, अभिनेत्री
मी मूळची जळगावची. माझे सासर आणि माहेर तिथलेच. मध्ये फक्त एका गल्लीचे अंतर. कामामुळे गेल्या काही वर्षांत जळगावात जास्त दिवस राहता आले नव्हते. लॉकडाऊनमध्ये मला दोन्ही कुटुंबीयांसोबत खूप छान वेळ घालवता आला. भरपूर गप्पा मारता आल्या. या सुट्टीत करायचे काय याचे शेड्युल असे काही ठरवले नव्हते. फक्त आलेला दिवस मनसोक्त एन्जॉय करायचा, आपल्या मनाला आनंद देतील अशा गोष्टी करायच्या एवढेच मनाशी पक्के केले होते.
घरातल्या घरात छान गेम्स खेळणे, ज्या रेसिपीज एरव्ही आपण हॉटेलात जाऊन खातो त्या हॉटेल बंद असल्याने घरच्या घरीच बनवणे, मला कविता करण्याचा छंद आहे. अनेक लिहिलेल्या कविता विसरत चालले होते त्या वाचल्या. ज्या कविता अपूर्ण आहेत त्या पूर्ण केल्या. बरीचशी पुस्तके वाचली. अनेक वर्षांनी पेंटिंगमध्ये रमले. ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेबसिरिज पाहिल्या. अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये स्वतःला सतत बिझी ठेवल्यामुळे घरात बसून कंटाळा येतोय असे जराही वाटले नाही. मोकळ्या वेळेत आपल्याला आपल्या आयुष्यातील जुन्या गोष्टी आठवतात. अशा मनाला आनंद देणाऱ्या आठवणीत देखील रमले.
गेल्या काही वर्षांत कामाच्या गडबडीत आपण स्वतःकडे आणि कुटुंबीयांकडे दुर्लक्ष करत चाललोय. यानिमित्ताने स्वतःला आणि कुटुंबीयांना वेळ देणे किती गरजेचे आहे हे प्रत्येकाला कळलेय. दुसरी गोष्ट म्हणजे, कोरोनापासून बचाव करण्यासाठी स्वच्छता किती महत्त्वाची आहे याचे महत्त्व अनेकांना पटलेय. बाहेरून आल्यावर आधी हात पाय स्वच्छ धुवावेत, असे जुनी माणसं नेहमी सांगायची. या छोट्या छोट्या गोष्टी मोठा आजार आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी खूपच फायदेशीर आहेत. आपण आता अनलॉक प्रक्रियेत असलो तरी कोरोना अजून गेलेला नाहीये. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या, बिनधास्तपणे वावरू नका असे माझे सर्वांना आवाहन आहे. कारण स्वतःची काळजी घेणे म्हणजे इतरांची सुद्धा काळजी घेणे आहे.























































