कोजागरी : मंतरलेली रसधारा

161

>> अंजली केऱ्हाळकर

दूरवरून पांढरा शुभ्र पदर वाऱयाने फडफडतोय. त्याच समवेत धुंद शुभ्र रसधारा हलक्या हलक्या वलयातून धुसरपणे शिंपण करतेय. मंद गंधा वस्त्र अजूनही रेशमात फडफडतंय. अन् चंद्राची किरणं लपेटत लपेटत, त्यात चांदणं गुंफत, चांदण्यांचेच तरल अलवार स्पर्शस्पंदन घेऊन अवतरलीय ती शुभ्र वस्त्रांकित ललना ‘कोजागरी’. नितळ तिच्या हास्याने नाव नोंदवलं मनामनावर अन् तीही घट्टपणे रुतत गेली सृष्टीच्या काळजावर… ‘कोजागरी!’.. मी या वसुंधरेच्याच कुशीतली एक चांदणकन्या! चंद्राच्या रसवर्धनाची एक स्वर्णिम अभिलाषा. माझ्यात अनेक रंग रुजलेत. तरीही फक्त एकच दिवस चंद्राच्या अमृतबिंदूंचं लेपन मला लाभत असतं. त्याचसाठी असं आसुसून पृथ्वीवर येण्याचा मानस! खरं तर असंख्य अशा जलधारांनी शिगोशिग भरलेली पृथ्वीची कूस शांतवते अन् मग उलगडत जातो हवाहवासा एक प्रवास! अंगोपांगी रोमांच उठवणारा, दिलदार असा एक सृष्टीचा नेटका आविर्भाव म्हणजे शरद ऋतू! या ऋतूची एक वेगळीच संपदा अन् सुरेख अदा. झिरमीर ओल्या किनारी हिरव्या छटा लहरत असतात. पावसाचं अपार देणं लाभलेली हिरवी सृष्टी, त्याच्या समृद्धीचा वारसा ओटीत भरून एकेका ऋतूची निर्मिती उजवत राहते. त्यातलाच हा अमृत ऋतू…शरद ऋतू!!

शरद ऋतूतील अश्विन पौर्णिमा ‘कोजागरी’. म्हणजे पृथ्वीवरील जनमानसांचा वर्धनध्यास. अमृताचं देणं देणारी ही पौर्णिमा अमृत कोजागरी दुग्ध रूपाने सगळय़ांना संजीवनी देते. घट्ट आटीव अन् केशरमिश्रित दुधाचा प्रत्येक थेंब हा वर्धनपेयच!’

शरद ऋतूचं हेच वैशिष्टय़! प्रफुल्लीत तन मन उत्फुल्ल काया मनोवांच्छित माया! अद्भूत या ऋतूच्या पौर्णिमेचा मोह श्रीकृष्णालाही पडावा ना? महा रास याच दिनी त्याने रचली. राधेसमवेत धुंद मदिर क्षणांचा उत्सवी रासमंथन रचत रचत उत्कट अद्वैताची परिसीमा गाठली. त्याच उन्मनी अवस्थेत साऱया गोपिकांना जाणीव-नेणिवेच्या प्रखर अभ्यासातून स्व-अस्तित्व विसरायला लावलं. हीच ती भाग्यशाली अमृत शरद पौर्णिमा!

तसं पाहिलं तर कोजागरीच्या भोवती अनेक उपकथा उलगडत राहिल्या. शास्त्र्ााrय, धार्मिक, आरोग्यदायी कथानकं येत गेली. अन् त्यामागचे अर्थही सांगत गेली. श्रीलक्ष्मी अन् ऐरावतासह इंद्र यांची पूजा मध्यरात्री पाटावर मांडली जाते. षोडशोपचारे त्यांचं पूजन होतं. केशरमिश्रित घट्ट आटीव दुधाचा नैवेद्य दाखवला जातो. म्हणूनच लक्ष्मी प्रत्येकाच्या घरी जाते, विचारते ‘को-जागर्ती?’ आणि मग असा पुजनात मग्न कुणी दिसला की ती ऐश्वर्याचा वर देते.

पंचेंद्रियांना लाभदायक असणारा हा दुग्धयज्ञ ऋषीमुनींनी सखोल अभ्यासातूनच प्रचारात आणलाय. खरं तर पाऊस पडून गेल्यानंतर, परतून गेल्यावरची निरभ्र आकाशातली ही पहिलीच पौर्णिमा असते. टिपूर चांदण्यांसाठी आकाशाचा पट स्वच्छ असतो. त्यामुळे चंद्रही मोठा भासतो अन् पृथ्वीच्या समीप असतो. म्हणूनही असेल, पण त्यामुळे समाजासाठी जागरणाची एक वेगळीच परिभाषा तयार झाली. खेळीमेळीत, विविध खेळांतून, कार्यक्रमातून या दुग्धपानाला एक आगळाच दिमाख लाभला. जागरण करून आटीव दुधाचा प्याला आरोग्यासाठी चंद्रबिंदू झिरपवून ओठी लावण्यातली गोडी वाढत चाललीय. याचं श्रेय खरोखर पूर्वज, ऋषीमुनींना द्यायलाच हवं!

धवल चांदण्यातलं हे जागरण ओज व बल वाढवतं हे मात्र नक्की. पृथ्वीतलावरचं हे अमृत देणं अपरंपार आहे. फक्त ओळखायला हवं त्यातलं माधुर्य, त्यातला हेतू!

रात्र अशी मंतरलेली

चांदण्यात न्हायलेली

शरदाचे दान घेऊन

गात्री राधेच्या रुजून उरली

श्रीरंगाच्या श्वासामधून

बन्सी देहभान विसरली

कोजागरीच्या चांदण्यांची

एक अनामिक कृष्णभूल

आसमंती रासरंगात दरवळली

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या