अभिप्राय- अस्वस्थतेचा संघर्ष 

 

 

 

>>शुभांगी पासेबंद

 

`धीही न संपणारं नाटक’ हे दोन अंकांत, दोन तासांत संपणारे नाटक विश्वाच्या अंतापर्यंत चालत राहणारे सत्य सांगते. राजकारण, भावभावनांचे दुर्बोध, गुंतागुंतीचे प्रसंग, कपट या सगळ्यावर उत्तम प्रकाश पाडते. नाटक ही बघायची गोष्ट आहे. कारण त्यात नेपथ्य, प्रकाश योजना व पात्रांचा अभिनय वगैरे एकत्र समजून मग आपल्याला प्रत्यक्षदर्शी असा अनुभव मिळतो, पण हे पुस्तक वाचूनदेखील मला खरोखर नाटक बघितल्याचा आनंद झाला.

या नाटकात प्रामुख्याने 18 ते 58 वयाची दहा पात्रं आहेत. या नाटकाचे प्रायोगिक सादरीकरण विवेक राज ठाकूर यांच्यातर्फे 2021 मध्ये करण्यात आले होते. अजून ते नाटक रंगभूमीवर आले नाही. शैलेंद्र तनपुरे यांची छानशी प्रस्तावना या पुस्तकाला मिळाली आहे. या नाटकाची सुरुवात मुंबईत होते. एका तरुण लेखकाला ग्रामीण पार्श्वभूमीवर नाटक लिहिण्यासाठी एक वर्षाची फेलोशिप देण्यात येते. या नाटकाचा नायक श्रीराज दीक्षित ‘काय सांगू राव’ अशा कथा, कविता लिहीत असतो आणि वाचकांना `राव’ या नावाने संबोधत असतो. त्याच्या चांगल्या शैलीमुळे तो लोकप्रिय होतो. ग्रामीण भागातील इंडीगाव किंवा इंडीपूर इथे तो आणि त्याची मैत्रीण राजश्री या नाटकावर काम करण्यासाठी पोहोचतात. पुढे त्याची कथा कशी होते, यावर हे नाटक आहे.

तशी ही थीम नवीन नाही. खड्डेमय रस्ते, भकास गावाचं सौंदर्य, फोनची रेंज नसणे, गावातला दुष्काळ, नायक आणि त्याची मैत्रीण बघतात. नंतर पुढची दोन पात्रे येतात ती म्हणजे एक शिवा, दुसरी गंगूबाई! सोनाबाई, धोंडीबा, सुंदरी, विठाबाई, येसू, सलीम, मिथुन हे सर्वजण दुष्काळाला कंटाळले आहेत. गावातील रावसाहेब जनतेशी संपर्क साधून त्यांचे प्रश्न आणि गाऱहाणी जाणून घ्यायचा प्रयत्न करत असतात. रोजगार हमी योजना, महागाई, लाल फितीचा कारभार यांचे दर्शन घडते. या नाटकात गंगूबाई म्हणतात की, मुलांची/मुलींची दुष्काळामुळे चार वर्षे लग्न नाही झाली. सामूहिक विवाह करून देऊन या मुलींची चांगल्या स्थळांशी लग्न करून देण्याची खोटी आशा रावसाहेब दाखवतो, पण प्रत्यक्षात तो या मुलींना विकून टाकतो.

शोषण आणि भ्रष्टाचार काही काही प्रसंगांत दाखवायचा प्रयत्न केला आहे. रेंज नसणं या बोचक प्रसंगानेच नाटकाला सुरुवात होते. आपल्या मुलीसाठी एक आई गंगूबाई उपोषण करते. पाठिंबा, विरोध, निष्ठा… सर्व शब्दांचे अर्थ बदलून टाकणारे प्रसंग बघायला मिळतात. ‘अन्याय जेव्हा खूप व्हायला लागतो ना शिवा, तवा जमीन फाटून जाती,’ हे गंगूबाईचं वाक्य काळजाला भिडतं. लेखक राजा ठाकूर यांची भाषा प्रत्यक्षपणे समोर संवाद करत असल्यासारखी जाणवते. रंजक, भेदक आणि पारदर्शी असे काही प्रसंग या पुस्तकात बघायला मिळतात. सत्याचा संघर्ष मांडणारं हे नाटक कधीच संपत नसतं. अस्वस्थ अशा पार्श्वभूमीवरील हे दोन अंकी नाटक आहे आणि ते जगात चालू राहणाऱया अनेक घडामोडींचा आरसा आपल्याला दाखवते.

कधीही न संपणारं नाटक   लेखक : राजा ठाकूर

प्रकाशक : वैशाली प्रकाशन, पुणे   किंमत : 150 रुपये